20.10.12

महिषासुरमर्दिनी दुर्गा


राक्षसांचा उन्माद वाढलेला, दुष्टशक्ती वरचढ झालेल्या आणि दैवी शक्तीची गळचेपी झालेली - अशा एकुण अवस्थेतुन मार्ग काढण्यासाठी सर्व देवदेवतांच्या एकत्रीतपणे केलेल्या प्रयत्नांतुन तयार झालेली एक महाशक्ती म्हणजे दुर्गा. देवीचं हे अष्टभुजा, सिंहवाहीनी, आणि शस्त्रास्त्रधारी रणरागिणीचं रूप म्हणजे शिवप्रिया पार्वतीने जगाच्या कल्याणासाठी घेतलेला भवानीचा अवतार असं आपण मानतो. पार्वतीनेच दुर्गा होउन महिषासुराचा वध केल्याचं आपण सगळ्यांनी वाचलेलं आहेच. मात्र केवळ एका रणचंडिने एकटीने कोट्यावधी राक्षसांवर केलेला हा हल्ला नव्हता. नसावा. हे होतं एक महायुद्ध.

रामायण-महाभारत या महाकाव्यांचा काळ अतीशय आधुनिक वाटावा  ईतक्या पुरातन ईतीहासात कधीतरी घडलेलं एक युद्ध. भगवान विष्णुंच्या दशावताराच्या कित्येक युगे आधी,  अगदी पुराणांच्या आणि वेदांच्याही आधी कधीतरी घडलेलं एक युद्ध. कदाचित मानव सभ्यतेच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये झालेलं पहिलं निर्णायक महायुद्ध म्हणता येइल. या युद्धामध्ये असभ्य आसुरी शक्तीचा पराजय आणि सभ्य मानवी संस्कृतीचा विजय झाला. ईतर जनावरांपासुन मानव स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करू शकला, ते या युद्धाच्याच परिणामस्वरूप. थोडा वैज्ञानीक (किंवा वैचारिक म्हणु) दृष्टीकोण लावून या महायुद्धाची भुमीका पाहिली तर दुर्गा अवतार म्हणजे किती प्रगत युद्धशास्त्राचं फलीत होतं हे आपल्या लक्षात येइल.

दुर्गासप्तशतीचा संदर्भ या ठीकाणी महत्त्वाचा ठरतो. सातशे श्लोकांचं हे पुस्तक म्हणजे देवीने केलेल्या महायुद्धाची युद्धगाथाच आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत अनेक भक्त सप्तशतीचं पारायण करतात आणि देवीने मधु कैटभ, महिषासुर आणि शुंभ-निशुंभ या दैत्यांचा वध कसा केला, याची आळवणी करतात.

देवीने मारलेल्या राक्षसांपैकी 'मधुकैटभ', 'महिषासुर' आणि 'शुंभनिशुंभ' यांचा संबंध सरळ मानव सभ्यतेच्या उत्क्रांतीशी जोडता येतो. मधु आणि कैटभ यांचा जन्म सृष्टीनिर्मितीच्या अगदी सुरवातीच्या काळातला. योगनिद्रेत असलेल्या नारायणांच्या कानातून त्यांची उत्पत्ती झाली, आणि सृष्टी निर्माण करण्याच्या कामात मग्न असलेल्या ब्रम्हदेवाचाच वध करायला हे दोघे निघाले. अश्यावेळी आदिशक्तीच्या प्रेरणेने भगवान विष्णु निद्रेतून जागे झाले आणि मुष्टीयुद्ध करून या असुरांचा वध केला, अशी आख्यायीका आहे.

मानवी सभ्यता निर्माण होण्याचा, माणसाला आपल्या अस्तीत्त्वाचं भान येण्याचा, किंवा विचार करण्याची शक्ती येणं सुरू होण्याच्या अगदी सुरूवातीचा हा काळ असला पाहिजे. म्हणुनच मधु कैटभ हे सरळ समोर दिसणा-या ब्रम्हदेवाला मारायलाच निघतात, आणि  नंतर कुठल्याशी अस्त्रशस्त्रावीना, केवळ मुष्टीप्रहाराने त्यांचा निःपात होतो.

मधु कैटभ कुठल्यातरी योजने अंतर्गत ब्रम्हदेवाचा वध करायला निघालेले नाहीत. ते सरळ समोर दिसेल त्याला मारावे, या प्रवृत्तीने पुढे होत आहेत. ते शारिरिकदृष्ट्या अशक्त नाहीत, शक्तीशाली आहेत. मात्र केवळ मुष्टीप्रहारांनी ते मरतात, कारण त्यांच्यामध्ये शक्तीचा वापर कसा करायचा याचं ज्ञान नाही. म्हणजे त्यांच्याकडे विचारशक्ती नाही. उत्क्रांतीच्या टप्प्यादरम्यान जे काही मानवसदृशः पण विचारहीन प्राणी निर्माण झाले, त्यांचा उपद्रव टाळण्यासाठी  अधिक उत्क्रांत मानवाने केलेला त्यांचा सफाया म्हणजे मधु-कैटभ वध म्हणता येइल. मानवी संस्कृतीच्या रक्षकाचं, पालनकर्त्याचं प्रतिक असलेल्या भनवान विष्णुंना मधु-कैटभ वध करण्याची मुष्टीयुद्धाची युक्ती सुचते, या मागची प्रेरणा म्हणुन सभ्य संस्कृती आदिशक्तीला वंदन करते. तीच्या प्रेरणेने ही शक्ती आली, असे म्हणुन मधु-कैटभाचा वध झाल्यावर तीच्या नामाचा जयघोष होतो.

महिषासुराचा काळ हा याची पुढची पायरी म्हणता येइल; जेव्हा की सभ्यतेचं भान आलेल्या मानव समाजाने जंगली अवस्थेत असलेल्या मानवसमुहाचा उपद्रव टाळण्यासाठी त्यांचा काटा काढला. जंगली प्राण्यांसारखे आक्राळविक्राळ राक्षस, त्यांची अचाट शक्ती आणि त्यांचे भयाण दिसणे यांचे संदर्भ म्हणुनच या गाथेत वारंवार येतात. मग महिषासुर जंगली रेड्याचं रूप घेऊन अंगावर धावून आला, किंवा अमुक एक राक्षस गिधाडाचं रूप घेऊन आकाशमार्गाने चाल करून आला वगैरे संदर्भ वाचनात येतात. मुळात या सर्व प्राण्यांसह जंगली अवस्थेत राहण्या-या मानवांचा नाश करून (किंवा त्यांना संस्कृती शिकवून) सभ्यतेचं भान आलेल्या मानवाने केलेलं हे अग्नीदिव्य आहे. ईतर राक्षसांच्या मानाने जास्त शक्तीशाली आणि थोडा जास्त उत्क्रांत झालेला असल्याने महिषासुराचा वध करणं सामान्य योद्द्यांसाठी शक्य नव्हतं. त्याने आपली सेना बनवली, राज्य बनवले, आणि मग सुसंस्कृत झालेल्या मानव समुहाच्या 'स्वर्गा' वर हल्ले करणं सुरू केलं. हा उपद्रव असह्य झाल्यावर स्वसंरक्षणाचा विचार करण्याची शक्ती असलेल्या या समुहाने काहीतरी मोठा हल्ला (काउंटर अटॅक) करायचं ठरवलं. सर्वांची आराध्य म्हणजे आदिशक्ती. म्हणुन मग तिच्याच पहिल्या सगुण रूपाची - सतीची प्रतीमा त्यांच्यापुढे उभी झाली. सतीचाच पुनर्जन्म म्हणजे पार्वती, म्हणुन मग पार्वतीवर दुर्गावतार धारण करण्याची जबाबदारी आली.

एका सामान्य स्त्रीने धारण केलेला हा रणरागिणीचा अवतार. मुळात विचार करण्याची क्षमता कमी असलेल्या राक्षसांना लक्षातच येणार नाही ईतकी बेमालुमपणे, एखाद्या सरप्राईज कॉम्बॅट फोर्स सारखी या सेनेची उभारणी झाली. स्त्री कधी युद्ध करेल, ही कल्पनाच त्यांच्या ध्यानिमनी नसेल. यासाठी संस्कृतीच्या प्रत्येक शिलेदाराने, (आपण त्यांना देव म्हणु) आपापली युद्धनिती त्या सेनेला शिकवली. अगदी धनुष्यबाणापासुन ते शंख, चक्र, खड्ग, त्रीशुल, सर्व शस्त्रांमध्ये पारंगत अशी सेना तयार झाली. 'देवीचे गण' म्हणजे कठीणातल्या कठीण परिस्थीतीचा सामना करण्यास सक्षम असे योद्धे तयार झाले. देवीचं वाहन म्हणून वेगाने पुढे जाणारा एक रथ तेव्हा पुरेसा नव्हता. मग कुठल्याही परिस्थीतीत पुढे जाणारा, वेळ पडली तर हल्ला करू शकणारा, आणि केवळ एका गर्जनेने वनात राहणा-या असुरांचीही घाबरगुंडी उडवू शकणारा सिंह देवीचं वाहन झाला.

महिषासुरमर्दिनीच्या मदतीला युद्धात सामिल झालेल्या अनेक शक्तींचा परिचयही दुर्गासप्तशतीमध्ये आहे. ब्राम्ही, वैष्णवी, ऐंद्री, या प्रत्येक देवाच्या शक्ती या युद्धात सामिल झाल्या होत्या. म्हणजेच वर सांगीतल्याप्रमाणे ही एक सरप्राईज टास्क फोर्स होती, जी शत्रुला अवाक करून त्याला पराजीत करण्यासाठी तयार झाली होती.

आधुनिक युद्धनितीमध्येही सरप्राईज अटॅकला किती महत्त्व आहे हे आपण जाणतोच. ओसामा-बिन-लादेन चा खातमाही अमेरिकेने सरप्राईज अटॅक करूनच केला होता. तसाच धक्का महिषासुराला देऊन त्याचा वध करण्यात देवीच्या सेनेला यश आलं आणि राक्षस म्हणजे असंस्कृती आणि असभ्यतेचा नाश झाला.

पुढे शुंभ-निशुंभ आणि रक्तबीज म्हणजे मानवी उत्क्रांतीतले अतीशय आधुनिक पाऊल म्हणावे लागेल. शुंभ निशुंभ हे ब-याच अंशी सभ्य संस्कृतीचे पालनकर्ते होते. मात्र स्वत्त्वाचं भान आल्यावर माणसात निर्माण झालेला अहं आणि सत्तेची, उपभोगाची लालसा यांनी त्यांना  असुर बनवले. रक्तबिजाची कथा तर खुपच प्रगत विज्ञानाकडे घेऊन जाणारी. त्याच्या वधासाठी पार्वतीला कालरात्रीचं रूप घ्यावं लागलं. कालरात्रीची कथा पुढे ओघाओघाने येइलच. तुर्तास महिषासुरमर्दिनीचा जयजयकार करून ईथे थांबु. 

18.10.12

पार्वती



ती पर्वतराज हिमालयाची कन्या. भगवान शंकरांची पत्नी. गणेश आणि कार्तिकेय या महापराक्रमी पुत्रांची माता, आणि ज्या दुर्गारूपाचं अधिष्ठान नवरात्राच्या नऊ दिवसांत तुम्ही आम्ही मांडतो, त्या दुर्गारूपाची मुळप्रकृती म्हणुन पार्वतीचा उल्लेख नवरूपांमध्ये महत्त्वाचा ठरतो. भगवान  शंकरांशी विवाह झाल्यामुळे पार्वती म्हणजे त्यांच्या आधिच्या पत्नीचा, म्हणजे सतीचा दुसरा जन्म  असल्याचं आपण परंपरेने मानतो.

मात्र हिमालय पर्वतांच्या रांगात वसलेल्या कुठल्याश्या एका नगराच्या प्रमुखाची एक साधारण मुलगी म्हणुन तीचा विचार करणे सुरू केल्यास पार्वतीने केलेल्या अग्नीदिव्यांचा खरा परिचय आपल्याला येइल.

कैलासाच्या अत्यंत दुर्गम शिखरावर वास्तव्याला असणा-या शिवाशी विवाह करायचा ध्यास तीने घेतलेला. या परिस्थीतीत राहणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. महिनोनमहिने बर्फाच्छादितच राहणा-या या प्रदेशात किती दिवस उपास पडतील याचा नेम नाही. म्हणुन तीने व्रत करून उपास-तापासाची सवय केली. उन-पाऊस-बर्फवृष्टी यांची पर्वा न करता ती अरण्यांमध्ये तप करत राहिली, ते यासाठीच.

शिवाशी विवाह झाल्यानंतर तीने पत्नी होण्याचा एक आदर्शच जगापुढे ठेवला. शिव-पार्वती संवाद, त्यांचे चौसर खेळणे, आकाशभ्रमणाला बरोबर जाणे, एकमेकांना वेगवेगळ्या पद्धतीने रिझवीणे, त्यांचा शृंगार, त्यांचे रूसवे-फुगवे, त्यांचे हास्य-विनोद या सगळ्यांची पुराणं, महाकाव्य आणि महाशिल्प झाली. शिव आणि शक्ती यांनी मिळून सोळा विद्या आणि चौसष्ट कलांची पायाभरणी केली. आपल्या संस्कृतीच्या एकुण जडणघडणीमध्ये या जोडप्याचं महत्त्व ईतकं की अगदी नव-याला 'महादेव' म्हणेपर्यंत!

या जोडप्याचा महिमा ईतका की अगदी नव-याला 'महादेव' आणि बायकोला 'पार्वती' म्हणेपर्यंत! सामान्य लोकभाषेमध्ये ईतकं चपखल बसणं या जोडप्याला जमलं याचं कारण म्हणजे देवाधिदेव महादेवांची पत्नी झाली म्हणुन पार्वतीने आपलं सामान्यत्त्व त्यागलं नाही. उलट मुळातच असामान्य आणि अवलीया असणा-या शिवालाही तीनं सामान्य पतीसारखं रूसवे-फुगवे, प्रश्न-उत्तरे, प्रेम-शृंगार, हास्य-विनोद, वाद-विवाद, शर्यती ईत्यादिंमध्ये गुंतायला भाग पाडलं.

कार्तीकेय आणि गणेश या दोन पुत्रांवर तिनं केलेलं प्रेमही हीच गोष्ट अधिक स्पष्ट करतं. शिवाच्या त्रीशुळाने धडावेगळं झालेलं आपल्या लाडक्या पुत्राचं, गणेशाचं शिर हातात घेऊन टाहो फोडणारी पार्वती; मातापित्यांना ब्रम्हांड मानुन त्यांची प्रदक्षीणा करणा-या आपल्या या पुत्राला शर्यतीत विजयी ठरवणारी पार्वती; आणि  कार्तीकेयाच्या विरहात मनोमन अशृ ढाळणारी पार्वती; प्रत्येकवेळी पार्वतीने आपलं सामान्यत्त्व जपलंय. म्हणुनच लहानग्या गणपतीला  अंघोळ घालतांना, त्याचे लाडकोड करतांना माता पार्वतीच्या प्रतीमा प्रचलीत झाल्या. कोणत्याही आईला ते आपलं लेकरू वाटेल, आणि कोणत्याही लेकराला ती आपली माय वाटेल ईतकी सामान्यांशी जवळीक तीने जपली.

अश्या पार्वतीने जेव्हा शस्त्रे हाती घेऊन दुर्गेचं रूप धारण केलं, तेव्हा मात्र ते सगळं असामान्यच होतं! ज्याला पाहूनच भलेभले गर्भगळीत होतील अश्या विक्राल सिंहावर स्वार होणं, देवदेवतांना अगदी लिलया धूळ चारणा-या एकापेक्षा एक भयंकर राक्षसांच्या सैन्यात एकटीने घुसुन त्यांचा  निःपात करणं; आणि धडावेगळ्या केलेल्या शिरांची मुंडमाळ करून गळ्यात मिरवणं हे सगळं दैवी, असामान्य, अदभूतच म्हणावं लागेल. सामान्यत्त्वापासुन असामान्यत्त्वापर्यंत झालेला पार्वतीचा हा प्रवासच तीला पुर्णपणे आदिशक्तीचं रूप बनवतो. पार्वतीचा राजकन्या ते रणचंडी हा प्रवास म्हणजे एक सामान्य स्त्री काय काय करू शकते, किंबहूना तीने काय काय करावे याची गुरुकिल्ली आहे.

एक राजकन्या शिवप्राप्तीसाठी जीव धोक्यात घालून जर तपाची पराकाष्टा करू शकते, तर एक सामान्य मुलगी आपल्या लक्षप्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा नाही का करू शकत? एक पर्वतकन्या एका सतत ध्यानमग्न अवस्थेत राहणा-या, तापट पण भोळ्याभाबड्या पतीला जर काव्यशास्त्रविनोदाचं वेड लावू शकते, तर कुणी सामान्य शहरी मुलगी आपल्या  नव-याला सिग्रेट सोडायला नाही का लावू शकत? आणि एरवी कोमलांगी गौरी असलेली शिवप्रिया जर दुर्गारूप धारण करून एकटीने हजारो राक्षसांना कापून काढू शकते, तर आजची सामान्य मुलगी तीची छेड काढणा-या एखाद्याला चपला-जोड्याने नाही का बडवू शकत?

पार्वतीने स्वतःतील आदिशक्तीला ओळखुन, तीचे आवाहन करून सामान्य जीवनातून  असामान्य जीवनाकडे वाटचाल केली. मात्र यातही आपला सामान्य पिंड तीने कायम जपला.  आदिशक्ती देवीचे पहिले सगुण साकार सौभाग्यवती रूप आणि म्हणुनच नऊ रूपांच्या मालिकेतील तीसरे रूप म्हणजे पार्वती.

17.10.12

सती



सती म्हटलं की पतीच्या चितेसह पत्नीने जिवंत जळण्याची अनिष्ट प्रथा आपल्यापैकी अनेकांना आठवेल. आता आपल्या समाजातून हद्दपार झालेली ही परंपरा नेमकी कुठून सुरू झाली असावी याचा शोध घेतल्यास दाक्षायणीच्या कथेचा संदर्भ येइल. दाक्षायणी म्हणजे विश्वेश्वर महादेवाची पहिली पत्नी. तिच्या पित्याकडे, प्रजापती दक्षाकडे असलेल्या महायज्ञाचं जावई असुनसुद्धा महादेवाला आमंत्रण नव्हतं. तरिसुद्धा आपल्या पित्याकडचा यज्ञ म्हणुन ती तिथं गेली. यज्ञस्थळी सर्व उपस्थीतांसमोर महादेवाचा झालेला अपमान असह्य झाल्याने तीने त्याच यज्ञकुंडात आत्माहूती दिली. शिवनिंदा श्रवण करण्यालाही महापाप मानुन दाक्षायणीने स्वतःच स्वतःसाठी घेतलेलं हे प्रायश्चीत्त होतं. यात तीने जी आत्माहूती दिली त्यानंतर तीला सती हे नामाभिधान मिळालं असावं. आपल्या पतीच्या सन्मानासाठी जीव देणे ही त्याच्याप्रती असलेल्या भक्ती वा प्रेमाची सर्वोच्च सिमा आहे असं मानुन त्या काळात सती हे नाव देऊन दाक्षायणीचा गौरव करण्यात आला असावा. सन्मानासाठी जीव देणे ही गोष्ट आपल्या संस्कृतीत नेहमीच गौरविली गेली आहे. मोगल आक्रमणांच्या काळात हजारो राजपुत स्त्रीयांनी सन्मानासाठी केलेले 'जोहर' आजही अभिमानानेच उल्लेखले जातात. त्याचप्रमाणे दाक्षायणीचा सती हा उल्लेख तीच्याप्रती, तीने केलेल्या कृत्याप्रती आदर म्हणुनच केला गेला असेल.

मात्र कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करून ती अत्यंत विकोपाला नेऊन ठेवणे हेच आपल्या समाजाचं दुदैव आहे. म्हणुनच पुढे या कथेचा विपर्यास होउन पतिनिधनानंतर त्याच्या शवासह स्वतःला जाळून घेण्याच्या प्रथेला सती हेच नाव मिळालं आणि 'सती जाणे' ही पद्धत सुरू झाली. नंतर जबरीने बायकांना सती जाण्यास लावण्याची अमानुष पद्धतही सुरू झाली, आणि सती म्हणजे  आत्मभान विसरून पतीच्या शवाबरोबर स्वतःला संपवणारी स्त्री अशीच धारणा तयार झाली. आत्मभान नसणा-या काही अवलीया स्त्रीयांनाही मग 'सतीमाय' म्हणवले जाऊ लागले. थोडक्यात काय, स्वतःला विसरून गेलेल्यांचं नाव सती झालं आणि मुळ संकल्पनेचा पार बट्ट्याबोळ झाला.

आता दाक्षायणीच्या कथेचा पुढचा भाग पाहू. सतीच्या आत्माहूतीनंतर शिवकोपाचा जो उद्रेक झाला तो आपणा सर्वांना माहितीच आहे. सतीचं पेटतं शव घेऊन शोकमग्न फिरणा-या शिवाला शांत होण्यासाठी  कित्येक वर्ष लागली असं म्हणतात. तिच्या पेटत्या शवाचे तुकडे जे पृथ्वीवर पडले त्यातून भारत देशभर शक्तीपिठांची निर्मीती झाली, असंही मानतात.

आपल्या देशात असलेल्या शक्तीपिठांच्या आकड्याबाबत संभ्रम आहे. ती चार आदिशक्तीपिठं, अठरा महाशक्तीपिठं, की एकावन्न शक्तीपिठं आहेत, की एकुण चौसष्ट मंदिरं आहेत, हे अजुनही नेमकं सांगता येत नाही. याल वेगवेगळे संदर्भ आहेत. मात्र कुठल्याही शक्तीपिठाची मुळधारणा ही दाक्षायणीची कथा आहे, हे मात्र नक्की. यापैकी जवळपास प्रत्येकच मंदिरांस स्वतःची अशी उत्पत्तीकथा आहे. तरीसुद्धा सतीच्या कथेचा संदर्भ देऊन करून दिलेली या शक्तीपिठाची ओळखच महत्त्वाची ठरते. म्हणुनच शक्तीपिठ म्हटलं की या ठीकाणी सतीच्या शरीराचा कोणता अवयव पडला होता? हा प्रश्न भक्तांना आधी पडतो.

मग माहूरमध्ये सतीचा उजवा हात पडल्यामुळे ते मुळपिठ ठरतं, कोल्हापुरमध्ये डोळे पडल्यामुळे ते जागृत दैवत होतं तर वैष्णोदेवीमध्ये देवीचं शिर पडल्यामुळे तीथे 'साचा दरबार' भरतो. देवीच्या अनेक रूपांच्या निर्मितीची मुळकथा ही दाक्षायणीची, सतीची कथा ठरते. म्हणुनच देवीच्या ईतर रूपांची आदिकारीका म्हणुन 'सती' हे आदिशक्तीचं पहिलं सगुण रूप आणि नऊ रूपांपैकी दुसरं नाव ठरतं.

16.10.12

आदिशक्ती


जागृत करुनी निरंकारा।निर्गूण आणिले आकारा॥
त्रिविध गुण लावूनी संसारा।रचिला जगडंबर सारा।
भू:जल तेज गगनवारा।बहु तत्वांच्या परिवारां॥
उत्पत्ती स्थिती संहारा।लाविले हिने विधी हरिहरा॥
करुनी परिमाण,केले निर्माण,जगाचे प्राण,सकळही सृष्टी मुळारंभा।

आपल्या परंपरांना प्रमाण मानलं तर आदिशक्तीच्याच प्रेरणेने विश्वाची निर्मीती झाली असं म्हणावं लागेल. अर्थात, कुणीही विज्ञानवादी ही गोष्ट मानणार नाही. कुणातरी एका देवीने निराकार विश्व जागृत करून जगाची निर्मीती केली, ही गोष्ट खरोखरच विज्ञान मानणा-या मनाला पटत नाही. विश्वनिर्मितीच्या पाऊलखुणा शोधत शोधत आता आपण बिग बॅन्गपर्यंत येऊन पोचलो आहोत. बिग बॅन्ग हे विश्वाच्या निर्मीतीचे कारण आहे, ही गोष्ट मानली, तर हा महास्फोट होण्यामागे काहीतरी कारण असायला पाहिजे. कदाचित उद्या जाऊन विज्ञान ते कारणही शोधून काढेल की कसल्यातरी 'बिग चेंज' मुळे हे बिग बॅन्ग घडले. परत प्रश्न आलाच, की हा बिग चेन्ज कुणी घडवून आणला! मुळ काय? प्रश्नातून प्रश्नच जन्म घेत राहतील, जर 'वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या' नावाखाली आपण आपल्याकडे मुळात असलेल्या उत्तराकडे दुर्लक्षच करत राहू!

कसलीतरी प्रेरक शक्ती या सर्व घटनांच्या मागे आहे, यावर तर कुणाचंच दुमत नसावं. याच प्रेरक शक्तीची आपल्या संस्कृत्तीने आदिशक्तीचे नाव देऊन पुजा बांधली आहे. आदिशक्ती ही एक कोण एक स्त्री किंवा देवी नाही. ते एक तत्त्व आहे. विश्वनिर्मितीमागची, सजीवतेची प्रेरणा देणारी एक शक्ती. छोटीशी मोपेड गाडी असो वा सुखोई विमान, ते सुरू करण्यासाठी एक ईग्नीशन लागतंच. चावी फिरवावी लागते. नॉब खालून वर करावा लागतो. बटण दाबावं लागतं. ही चावी, नॉब किंवा बटण म्हणजे जर 'बिग बॅन्ग' असेल तर ती फिरवणारे हात म्हणजे आदिशक्ती.

हे हात कुणीच पाहिले नसतात, कारण चावी फिरवून, बटण दाबून आणि मशिन सुरू करून ते बाजुला झालेले असतात. आपण या जीवसृष्टीच्या मशिनमध्ये आत कुठेतरी फिरणारे पुर्जे असतो.  आपल्याला कुठे दिसणार चालवीणा-याचे हात? पण म्हणुन चालवणारे हात तीथे नाहीतच असं अजीबात नसतं. चालवणारा आहे तोवरच गाडी सुरू राहू शकते. आपल्या जीवसृष्टीची गाडी सुरू आहे. म्हणजे चालवणारे हात आहेत. हे हात म्हणजेच आदिशक्ती.

निर्गुण निराकाराची संकल्पना मुळात समजणंच कठीण. आपल्यासारख्यांच्या डोक्याच्या अगदीच बाहेर. म्हणुनच कदाचित आपल्या समाधानासाठी किंवा सोयिसाठी आपण या अदृ:श शक्तीला दृ:श रूपात आणलं. मग ही जीवन देणारी शक्ती असल्याने सहाजीकच तीला मातेचं, स्त्रीचं रूप मिळालं. पुढे वाईट शक्तींचा अंत करण्यासाठी ज्या स्त्रीयांनी शस्त्रे हाती घेऊन अतुल पराक्रम गाजवला, त्यांना याच प्रतिमेशी जुळवून त्यांच्या दंतकथा निर्माण झाल्या. शेवटी सगळ्या रूपांना केलेला नमस्कार जाऊन मिळतोय तो एकाच ठीकाणी.

वैदिक काळातील ऋषिंमुनिंना सुर्यमालेतले नऊ ग्रह कुठल्याही हाय-एन्ड टेलिस्कोपशिवाय दिसले, त्यांच्या भ्रमणकक्षात्यांचा भ्रमण कालावधी, त्यांच्यावरील दिवस-रात्रीची गणितंही समजली, यावरूनच आजच्या कुठल्याही वैज्ञानिकापेक्षा त्यांची समज जास्त होती हे सिद्ध होते. त्यांनी या कथा, ही रूपं वर्णन केली. म्हणजे नेमकी हीच रूपं रंगवण्यामागे काहीतरी अभ्यास, हेतू असला पाहिजे हे नक्की.

म्हणुनच आदिशक्ती जरी कुणालाच दिसणारी नसली, तरी तीची ही दर्शनी रूपं त्या मुळ रूपाच्या खुप जवळ नेऊन ठेवणारी आहेत, असं म्हणायला हरकत नाही. म्हणुनच देवीच्या नऊ रूपांपैकी पहिलं रूप निर्गुण आदिशक्ती आहे. आणि नंतर सुरू होतात ते तीने स्वतः रचलेल्या या जगडंबराच्या कल्याणासाठी निर्माण झालेली तिचीच ईतर रूपे.

15.10.12

जय माता दि!


वातावरणातला बदल एका दिवसात जाणवायला लागतो. धुपाचा, राळेचा सुगंध, आरतीच्या वेळी होणा-या घंटानादाची किणकिण, शंखाचा धिरगंभीर आवाज, आणि 'साचे दरबार की जय' चा तो चिरपरिचीत जयघोष -- आपोआपच या सर्व गोष्टी जाणवू लागतात आणि मन नव्या उमेदिने भरून येऊ लागते. नवरात्रीचे नऊ दिवस सुरू झालेले असतात. कधी नव्हे ते उपास करावेसे वाटतात. आंघोळ केल्याशिवाय घराच्या बाहेर पडण्याची ईच्छाच होत नाही. वातावरणात पसरलेला धुपाचा मंद सुगंध आत अगदी हृदयापर्यंत पसरल्याची जाणीव होत राहते. आपणही या नऊ दिवसात अंतर्बाह्य बदलून गेल्याचीच जाणीव! आदिशक्तीचं पर्व म्हणतात ते यामुळेच. आपल्या हृदयाला धडधडण्याची प्रेरणा देणा-या, या ब्रम्हांडात जीव भरणा-या एका मुलशक्तीच्या पुजनाचे हे नऊ दिवस. 

बिग बॅन्गच्या थेअरीमुळे विश्वाची निर्मीती झाली आणि गॉड पार्टीकल हा ब्रम्हांडातील सर्वांत सुक्ष्म अणुकण आहे, ईथपर्यंतचा शोध विज्ञानाने लावला असला, तरीही बिग बॅन्ग ला घडवून आणण्यामागे कसलीतरी शक्ती आहे, हे कुणीही टाळत नाही. आईन्स्टाईनपासुन ते डार्वीनपर्यंत सर्व वैज्ञानिकांनी एका मुलप्रेरक शक्तीची संकल्पना मान्य केली आहे. खरा विज्ञाननिष्ट ही संकल्पना मान्य करतोच. मग शास्त्रज्ञ त्याला काहीतरी वैज्ञानीक नाव देतात आणि सामान्य लोक म्हणतात - आदिशक्ती!

आपल्याला विश्वाची निर्मीती वगैरे मोठमोठ्या गोष्टीत जायचेच नाही. वैष्णवदेवीच्या नुकत्याच केलेल्या यात्रेत झालेली अनुभुतीच देवी दाखवायला सक्षम आहे. धड दोन किलोमिटर चालण्याची सवय नसलेले आम्ही पंधरा लोक चौदा किलोमिटरचा डोंगर चढत वरपर्यंत पोचलो. वैष्णोदेवीचा डोंगर चढतांना थकवाच येत नाही, वगैरे गोष्टी ऐकल्या होत्या. त्या सपशेल खोट्या असल्याचा प्रत्यय आला तो खरंच डोंगर चढून गेल्यावर. पायात मोठमोठे गोळे आलेले आणि जागचं हलावंसंही वाटेना ईतका जास्त थकवा. पण तरीही पुढे चालत राहिलो. कसेकाय

थकून विसाव्याला बसलं, की आजुबाजुच्या यात्रेकरूंकडे सहज नजर जायची. काठी टेकवत टेकवत हळूहळू पुढे जाणारी ती सत्तरीच्या घरातली म्हातारी, 'जोर से बोलो जय माता दि' म्हणत वडिलांच्या चालण्याच्या गतीशी जुळवून घेत स्वतः धावणारा पाच वर्षाचा तो मुलगा; नाजुक हा शब्द खुप कमी पडेल ईतकी नाजुक -- अक्षरशः गुलाबी असलेली आपली अनवाणी पावलं 'जय माता दि' च्या नामजपासरशी झपझप पुढे टाकणारी ती सतरा-अठरा वर्षाची मुलगी. सहाएक महिन्याच्या आपल्या मुलीला पाठीवर बांधून घेऊन जाणारी ती आई, आणि चारेक वर्षाच्या मुलाला खांद्यावर बसवून चालत जाणारे बाबा... अशी कितीतरी उदाहरणं पाहिली की आपोआपच चालण्याची उमेद मिळायची. 'आपल्यालाही जायचंय' असं सहज वाटून जायचं आणि पावलांत शक्ती यायची, आपोआप!

वरच्या गुहेमध्ये पाचेक सेकंदांपर्यत झालेलं देवीच्या तीन पिंडांचं दर्शन म्हणजे वैष्णोदेवी नव्हेच! वैष्णोदेवी चौदा किलोमिटरचा पहाड चढण्याची उमेद आहे. हसत हसत काठी टेकवत पुढे जाणारी ती म्हातारीही वैष्णोदेवी आहे. अनवाणी पायांनी गड चढणारी ती मुलगी, पाठीवर मुलीला बांधून 'जय माता दि' म्हणणारी ती आई, आणि खांद्यावर मुलाला बसवून 'प्रेम से बोलो' म्हणायला लावणारे ते बाबा... वैष्णोदेवी तीथे भेटते. गड चढून झाल्यावर त्याहीपेक्षा वर असलेल्या भैरवबाबांच्या मंदिरात जाण्याची सहज येणारी उमेद म्हणजे वैष्णोदेवी आहे. उतरतांना सहज ओठावरती येणारे भजन म्हणजे वैष्णोदेवी आहे. खाली उतरल्यावर आपल्या बसमध्ये परत बसतांना ढगाच्या आड कुठेतरी लपलेल्या दरबाराकडे नजर टाकून 'आपण त्या ढगाच्या आत जाऊन आलो!' हा विचार केल्यावर चेह-यावर येणारं हास्य म्हणजे वैष्णोदेवी! 'आपणही करून दाखवलं' आणि 'आपल्यातही शक्ती आहे' ही अनुभुती म्हणजे वैष्णोदेवी आणि आणि उतरल्यानंतर पायांचा भुगा झालेला असुनही 'पुन्हा एकदा यावंच लागते!' अशी ईच्छा मनात राहणे, म्हणजे वैष्णोदेवी आहे.

चराचरात व्यापलेल्या शक्तीचा अंश आपल्यातही आहे याची प्रचिती आली, म्हणजे सार्थक झालं की नऊ दिवसांचं. म्हणुनच आपल्या शरीर आणि मनाला आव्हान देऊन ही प्रचिती घेण्यासाठी कठीण व्रतवैकल्ये आणि उपासांची परंपरा सुरू झाली असणार. देवीच्या या नऊ दिवसांमध्ये आजवर वाचून ऐकून आणि समजुन घेतल्यावर उमगलेली देवीची नऊ रूपं मला कळली तशी मांडण्याचा विचार केला आहे. बघूया कसं जमतंय ते.