31.12.10

संकल्प!

आजपासून रोज लिहणार आहे.

म्हणजे तसा संकल्पच केलेला आहे. थोडं ना थोडं तरी लिहायचं. आपल्याला वेळ काढता येत नाही, हे काही कारण नाही.

डिसेंबर महिन्यात अमिताभ बच्चन पेंच व्र्याघ्र्यप्रकल्पाच्या दौर्र्यावर आला होता. अमीताभ संध्याकाळी पाच वाजता नागपूर विमानतळावर उतरला, आणि विमानतळाच्या समोर उभ्या असलेल्या हजारो चाहत्यांना चुकवून मागच्या बाजूच्या रस्त्याने सोनेगावमार्गे पेंचकडे कुच केलं. मात्र सोनेगाव रस्त्यावरही काही उत्साही चाहते आणि पत्रकारांनी त्याला गाठलंच. तीथे काही मिनिटांसाठी थांबून अमिताभने चाहत्यांना सह्या दिल्या, पत्रकारांशी हितगुज केलं, आणि जास्त गर्दी व्ह्यायच्या आत तीथून पेंचकडे प्रयाण केलं.

अमिताभ सात-साडेसात पर्यंत पेंच ला पोचला असावा. आम्ही सर्व न्युजरूम मध्ये अमिताभची बातमी कशी घ्यायची यावर चर्चा करत होतो. फोटोग्राफरने फोटो आणले होते. कुणीतरी बातमी आणली होती. अमिताभच्या बिग-अड्डावरच्या ब्लॉगवरतीसुद्धा सहज म्हणून भेट दिली. नागपूरकडे निघण्याच्या आदल्या दिवशी त्याने ब्लॉगवरती पेंचबद्दल लिहलं होतं. "पेंचला जाऊन वाघ पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. या डौलदार जनावराचं संरक्षण व्हायला हवं" या आशयाचा तो लेख होता. त्यातली काही वाक्यं आम्ही बातमीमध्ये वापरली. एक ठीकठाक बातमी तयार झाली.

दहाएक वाजताचा सुमार. पानं बांधून पाठवण्या आधी सहज म्हणून पुन्हा अमिताभच्या ब्लॉगला भेट दिली. आणि काय आश्चर्य! अमिताभने आजचा नवाकोरा ब्लॉगही लिहला होता. नागपूर ते पेंच या प्रवासादरम्यान त्याला दिसलेलं नागपूर शहर, जंगलात जातांना वाटलेली उत्सुकता, आणि पेंचच्या रिसॉर्टमधली हिवाळी रात्र या सगळ्याबद्दल अमिताभने आपल्या ओघवत्या ईंग्रजीत खुप छान लिहलं होतं. वेळेवर बातम्या हलवल्या, आणि अख्खाच्या अख्खा ब्लॉगच अमिताभच्या बातमिबरोबर लावायचं ठरवलं. तेव्हा जाणवलं. बिझी बिझी म्हटलं, तरीही आपण काही अमिताभपेक्षा जास्त बिझी नाही. जर बिग बी वेळ काढू शकतो, तर आपण नक्कीच काढू शकतो. मग ठरवलं. ब्लॉग रोज लिहायचा. नव्या वर्षाचा संकल्पच हा!

नव्या वर्षाचे संकल्प सहसा विसरून जाण्यासाठी असतात, असं म्हणतात. पण हा संकल्प मात्र विसरता येणार नाही. कारण हा संकल्प आजचा नाही. साडेतीन वर्ष झाली गाव सोडून. ब्लॉग बनवून ठेवले आहेत अगदी तेव्हापासूनच. या साडेतीन वर्षात निदान साडेतीनशेवेळा तरी ठरवलं असेल की लिहायचं.. लिहायचं! पण नाहीच जमलं. अमिताभने मात्र प्रेरणा दिली आहे. आता लिहणार.

आज नव्या वर्षाचा पहिला दिवस. सगळं छान छान झालं पाहिजे. म्हणजे वर्ष छान जाईल. आजचा दिवस असाच एका नवेपणाच्या जाणिवेसह जाईल. तसाच एकतीस डिसेंबरचा दिवसही! कितीही नाही म्हटलं तरी थर्टीफर्स्टची एक उत्सुकता राहतेच. आपल्याला माहिती असतं, की रोजच्यासारखाच आजचाही दिवस निघणार आहे. रोजच्यासारखंच आजही कुठेतरी रिपोर्टींगला जायचं आहे. रोजच्यासारखंच आजही पान बांधायचं आहे. आणि रोजच्यासारखंच आजही 'बारा वाजता संपवतो' असं म्हणता म्हणता दिड वाजेपर्यंत शेवटचं पान सोडायचं आहे! तरीही एक उत्सुकता असते. आज वर्षाचा शेवटचा दिवस! काहीतरी सेलिब्रेट केलं पाहिजे. कुठेतरी गेलं पाहिजे. काहीतरी पार्टीशार्टी! पण या वर्षी थर्टीफर्स्ट खुपच थंडा निघाला. अक्षरश: ब्रेड बटर आणि कटलेटवर थर्टीफर्स्टची पार्टी! विश्वास बसत नाही!

पाचेक वाजताच्या सुमारास अनुभव डबीर घरी आला. "चल हिंडून येऊ! शहरातला माहोल पाहू!" नेहमीचंच! निघालो. तेही नेहमीच्याच रस्त्याने. फिरत फिरत सदरमध्ये आलो. मग कॉफी हाऊस! आणि कॉफी हाऊसमध्ये गेलं की ब्रेडबटर आणि साधा दोसा! ऑर्डर्स दिल्या. "आज कटलेट मंगवाते है" -- चालेल! व्हेज कटलेटही मागवलं. तोच ऑफीसमधून फोन आला. डेस्कहेडचा. "जल्दी आ जाओ, आज जल्दी खत्म करके घर चले जाएंगे!" -- सदरमधून घरी जाणं आणि घरून परत ऑफीसला धंतोलीला येणं म्हणजे सहाच्या आत पोचणं अशक्यच होतं. अनुभवला म्हटलं, की मला ऑफीसमध्येच सोडून दे. बर्र्याच दिवसांनी गाडी न घेता ऑफिसला गेलो. पण घरी जायचे वांदे होणार! कुणालातरी सोडून मागावे लागणार!-- असो. थर्टीफर्स्ट आहे. कुणीही सोडून देइल! ऑफीसला गेलो. गेल्यावर असा काही अडकलो, की बाहेर जाण्याचं कामच नाही. मला बोलावून डेस्कहेड घरी गेला - 'मेहमान' आले होते ना! काम सुरू झालं. हा आला, की आपण बाहेर जाऊ जेवायला असा विचार करून त्याची येण्याची वाट बघत राहिलो. महाशय अकरा वाजता आले! म्हणजे माझं बाहेर जाणं राहिलंच! अच्छा ऑफीस झाल्यावर बाहेर जावं, तर जवळ गाडी नाही! शेवटी त्यालाच घरी पोचवून मागीतलं आणि सरळ घरी आलो.

आता भूक लागली आहे. पण तरीही आज आपल्या संकल्पाचा पहिला दिवस, म्हणून लिहलं.
आजचा हा भुकेल्यापोटी लिहलेला ब्लॉग काहीतरीच अजाग़ळ वाटू शकतो, पण संकल्प म्हणजे संकल्प! पहिल्याच दिवशी परिक्षा पाहिली वाटतं देवा! ठीक आहे! पर हम भी कुछ कम नही! आजपासून लिहणारच!

जीव जाओ का जलेबी खाओ!