26.12.08

संध्याकाळ अन आठवण

.. .. .. ...
हल्ली संध्याकाळ अनुभवायलाच मिळेनाशी झालेली आहे. तशीही वृत्तपत्रविश्वात काम करणार्र्यांना संध्याकाळ कमीच अनुभवायला मिळते. आमचं तर कामच नेमकं संध्याकाळी सुरू होतं, आणि रात्री उशीरापर्यंत चालतं. त्यामुळे संध्याकाळचे असंख्य रंग डोळ्यांऐवजी मनातच आपली उधळण करत असतात. आजवर अनुभवलेल्या संध्याकाळची आठवण मग आजच्या संध्याकाळीचं चीत्र मनात गुंफायला लागते. हल्ली या आठवणींच्या भरवश्यावर कामाचं त्राण मिळवता येऊ लागलं आहे. मात्र पुर्वी खूप विचीत्र वाटायचं हे. संध्याकाळच्या, तीन्हीसांजेच्या, दिवेलागणीच्या, सांजवातीच्या वेळी, घरी परत यायच्या वेळी, आपलं घरातून बाहेर पडणं. पण आठवणींच्या बळावर निभावून नेणं जमायला लागल्यापासून बरंच बरं आहे. तसंही आठवणींच्या भरवश्यावर आता बरंच काही जमवावं लागतय, आणि जमवावं लागणार आहे.
ही तूमचीच कृपा. काही दिवसांचीच आपली सोबत. पण ती नेहमीकरताच असावी असं वाटण्याईतकी सुंदर तूच बनवलीस. मला तर वाटलं होतं, की ही सोनेरी सोबत कायम रहाणार नेहमीसाठी. म्हणूनच तूला न वीचारता तशी स्वप्नही पहायला लागलो. पण तूला जणू माहितीच होतं, की आपली सोबत जास्त दिवसांची नाही. म्हणूनच मिळाले तीतक्या क्षणांचा तू ‘मोगरा’ केलास. आज हातून सुटला, तरी सुगंध कायम राहिल त्यांचा दिगंतापर्यंत.
आता त्या सोनेरी क्षणांच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर मला एकट्यालाच झुलायचं आहे. संध्याकाळची सवय व्हायला वेळ लागला होता. तसाच तूझ्या नसण्याचीही सवय व्हायला लागेल.

पण होईल सवय. करावीच लागेल.

पण तू परतच का येत नाहीस? नेहमीसाठी?

खरं सांगू... आयुष्य़ात पहिल्यांदा प्रेम केलं. हो म्हणाली असतीस, तर जीवापाड जपलं असतं हे पहिलं प्रेम. पण नाही म्हणालीस, हे ही ठीक आहे. कारण जी गोष्ट पुर्ण होते, ती संपते. माझं पहिलं प्रेम अपुर्ण आहे. म्हणजे ते संपलेलं नाही. संपणारही नाही. सतत, आयुष्य़भर माझ्या बरोबर राहील. तू मोगरा केलेल्या क्षणांच्या दरवळाच्या रूपाने. तूझ्या सोनेरी सोबतीच्या आठवणींच्या रूपाने.