15.1.11

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना ऐकल्यावर...

मकरसंक्रंतीच्या शुभमुहुर्तावर शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरेंना ऐकायला मिळावं हे केवढं मोठं भाग्य! 'राजा शिवछत्रपती' नव्याने वाचायला घेतलं आहे, आणि सुरवातीलाच प्रत्यक्ष शिवशाहिरांचं दर्शन व्हावं हा मणीकांचन योगच नव्हे का! पत्रकारीतेच्या नोकरीमध्ये आजच्यासारखा योग जुळून आला की करतोय त्या धडपडीचं सोनं होतंय अशी खात्री पटते. निमित्त होतं एका पुस्तकाच्या प्रकाशनाचं. प्रा. विष्णु घनश्याम देशपांडे. उर्फ ‘महाराज’ यांच्या कार्याचा गौरव करणारा एक ग्रंथ 'तेजाळल्या स्नेहज्योती' हा त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नागपूरच्या श्री मंगेश प्रकाशन ने प्रकाशित केला. विघची सुन डॉ. सौ रंजना ह्यांनीच हा ग्रंथ लिहलाय. लिहलाय म्हणण्यापेक्षा संपादित केलाय असं म्हणणं जास्त योग्य राहिल, कारण यात अनेकांचे 'महाराजां'च्या सहवासातले अनुभव आहेत, अनेकांच्या आठवणी आहेत, प्रत्यक्ष महाराजांची भाषणं आहेत. आणि बरंच काही. हिंदू महासभेचे नेते, शिवाय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म – नव्हे -- भारतीय संस्कृती, आणि भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे एक अभ्यासु नेतृत्त्व ‘महाराजां’नी देशाला दिले. त्यामुळे त्यांच्यावरील गौरवग्रंथाच्या प्रकाशनाला बाबासाहेब पुरंदरेंसारखा तपस्वी आवर्जुन उपस्थीत राहिला.

तो काळच वेगळा होता असं म्हणावं लागेल. नागपूरचा, त्याहीपेक्षा मंगळवेढा नावाच्या एका छोट्याश्या गावात राहणारा एक माणूस देशपातळीवर नेतृत्त्व करतो, विदिशा, गुणा, ग्वाल्हेरसारख्या नागपूरपासून कोसो दूर असलेल्या मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूका लढवतो, आणि निवडूनही येतो, हे सगळं आजच्या काळात अविश्वसनियच. मुळात महाराज अर्थात विष्णू घनश्याम देशपांडे हे नाव मला देखील या आधी माहिती नव्हतं. मुळचे नागपूरचे असलेले देशपांडे गुणा येथून पाच वर्षे खासदार होते, त्यानंतर पदविधर मतदारसंघातून महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर निवडून गेले वगैरे माहिती आजच मिळाली. मुळात कधी ही माहिती मिळवण्याचा प्रयत्नही केला नाही, आणि कुणी सांगण्याची तसदीही घेतली नव्हती. मात्र आज या माणसाचं कतृत्त्व ऐकलं, आणि आपलंही आडणाव देशपांडे असल्याचा अभिमान वाटला. पुस्तक अजुन वाचलेलं नाही, वाचीन तेव्हा त्यावर लिहीन. तुर्तास आजच्या प्रकाशनसमारंभाबद्दल...

बाबासाहेब पुरंदरेंच्यां हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. सोबत प्रमुख वक्ते म्हणून हभप चारूदत्त आफळे होते तर कार्यक्रमाचं अध्यक्षपद भुषवलं होतं ते विक्रम सावरकर यांनी. तीघांना ऐकण्यासाठी ईतके लोक आले होते, की कधी नव्हे ते सायंटीफीक सोसायटीच्या हॉलमध्ये 'उभे राहून' लोकांनी ही भाषणं ऐकली. बाबासाहेब पुरंदरेंना ऐकण्याची उत्सुकता नक्कीच जास्त होती. सार्थ होती. स्वरवाहिनी अर्थात व्होकल कॉर्डवर ताण देऊ नका, अन्यथा ती फुटूही शकते, असा सल्ला डॉक्टरांनी दिल्यानंतरही बाबासाहेब पुरंदरे बोलले. भरभरून बोलले. मनापासून.

त्यांच्याआधी बोललेल्या चारूदत्त आफळे गुरूजींनी आपल्या प्रमुख भाषणातून महाराजांच्या अनेक आठवणी सांगीतल्या आणि या व्यक्तीमत्त्वाची ओळख करून दिली. 'एक किर्तनकार या नात्याने या राष्ट्रपुरूषाचं आख्यान मी आपल्यापुढे मांडलं" असं नम्रपणे नमुद करतांनाच आफळे गुरूजींनी आज हिंदुस्तानातच हिंदू समाज कुचंबणा का सहन करतोय, याचं सुरेख विवेचनही केलं. "धर्मांतरणं होतात, यात ख्रिश्चन मिशनर्र्यांचा धूर्तपणा हे जितकं महत्त्वाचं कारण आहे, तीतकंच महत्त्वाचं कारण आहे हिंदू धर्मगुरूंची धर्मकार्यामार्फत केल्या जाणार्र्या समाजकार्याप्रती अनास्था! चर्चकडे पैसा आहे, आणि ते कोट्यावधी डॉलर्स भारतातील गरीब आदिवासिंच्या धर्मांतरणासाठी खर्च करतात. पण आपली श्रीक्षेत्रेही काही कमी श्रीमंत नाहीत. पैसा आपल्याकडेही आहे. आई तुळजाभवानीला नवरात्रीच्या नऊ दिवसांत दहा हजार साड्या आल्या, असं तुळजापूर संस्थानच मोठ्या अभिमानाने जाहिर करतं. मग या दहा हजार साड्यांपैकी पाच-पन्नास मेळघाटातल्या आदिवासिंसाठी का नाही पाठवत? लोक सदगुरू साईबाबांना बत्तीस कोटींचं सुवर्णासन देतात, पण चार पाच लाख रूपये आश्रमशाळा चालवणार्र्या हिंदू सेवाभावी संस्थांना का देत नाहीत? तिरूपती देवस्थानाचे खांबही सोन्याचा मुलामा चढवून ठेवलेले आहेत. तरीही भक्त तीथे सुवर्ण दान देतात. द्यावं. भक्ती आहे, भावना आहेत. मात्र एक कोटीचं सोनं देवाला देऊन झाल्यावर निदान एक लाख रूपये तर हिंदू समाजाच्या उत्थानासाठी खर्च करायला हवे की नको? मात्र आपले धर्मगुरू -- शंकराचार्य -- या बाबतीत उदासिन आहेत. त्यांनी सुचवलं, की देवावर खर्च करता, तसाच समाजावरही करा, तर नक्कीच देणारे हात वाढतील, आणि हिंदू सेवाभावी संस्थांचंही बळ वाढेल. धर्मांतरणाला रोखता येइल!" असा विचार आफळेबुवांनी मांडला. आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी बौद्धीक सुमारिकरणाचा विषयही मांडला. "ज्ञान तर दूरची गोष्ट, हल्ली माहितीही नसते, आणि ती मिळवण्याचा प्रयत्नही नसतो." भारत देशाच्या हजारो वर्षाच्या देदिप्यमान ईतीहासाप्रती आपल्या मनात असलेली अनास्था आपल्याला घेऊन बुडणार की काय ईतकी भयंकर वाढलेली आहे. एक तर खरा ईतीहास मोडीत काढून खोटा ईतीहास सांगणं सुरू आहे. एनसिईआरटी पासून ते सीआयईटी पर्यंत सगळ्यांनी हिंदूराष्ट्र असलेल्या भारताच्या ईतीहासातून हिंदुत्त्वच मिटवण्याची शपथ घेतली आहे. अश्या या वाळवंटात खरा ईतीहास सांगणारी हिरवळ असं हे पुस्तक असल्याचं आफळेबुवांनी सांगीतलं.

आफळेबुवांच्या भाषणातीलच मुद्दा उचलत बाबासाहेब पुरंदरेंनी बोलायला सुरूवात केली ती 'सा मां पातू सरस्वती भगवती!' या ओळीने. "सध्या देशापुढे तीन बिकट समस्या उभ्या आहेत -- जातीयवाद, चंगळवाद आणि दहशतवाद. आणि या सगळ्यांना पोषक ठरत आहे ते म्हणजे अज्ञान! आपण अज्ञान जपतो, आणि म्हणूनच चंगळवादाकडे वळतो. आपल्यात धर्माबद्दल अभिमान कमी आणि जातींबद्दल अढीच जास्त आहे. परकियांकडून सहाय्य घेऊन दहशतवाद आता आपल्या घरापर्यंत पोचलाय आणि आपण महासत्ता बनण्याची स्वप्न बघत झोपा काढतोय. आपण शिवाजी महाराज वाचतो, सुभाषचंद्र बोस वाचतो, सावरकर वाचतो आणि म्हणतो की वा! काय देशभक्ती! केवढा त्याग! किती शौर्य! केवढी हिम्मत! आणि पुस्तक बाजूला ठेवून देतो. आपण स्वतःमध्ये कधी आणणार हे सगळे गुण किंचीत तरी? आपण कधी करणार थोडीतरी हिम्मत? आपण कधी दाखवणार जरासं धैर्य?" बाबासाहेब पुरंदरे बोलत होते. लोक विलक्षण एकाग्रतेने ऐकत होते. "समर्थ रामदास स्वामी रोज बाराशे सुर्यनमस्कार घालायचे. आपण बाराही घालत नाही! मग मनाचे श्लोक वाचून काय फायदा?"

"हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू म्हणजे श्री शंकराचार्य! यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, त्या पदावर, त्या आसनावर माझी नितांत श्रद्धा आहे. मात्र शंकराचार्यांप्रती मला एक तक्रार आहे. ज्या वेळी शिवाजीमहाराजांना राज्याभिषेक होणार होता, तेव्हा तब्बल साडेतीनशे वर्षानंतर एक हिंदू राज्य जन्म घेतंय या नितांत आनंदाने दिपून जाऊन पाचही पिठाच्या शंकराचार्यांनी दोन्ही हात वर करून महाराजांना आशिर्वाद द्यायला हवे होते. मात्र एकाही शंकराचार्याने येऊ नये, ही केवढी अनास्था!" शिवाजी महाराजांबद्दल बोलतांना बाबासाहेबांमध्ये विलक्षण शौर्य संचारतं, शक्ती येते, याचा प्रत्यय आज आला. "राजा... राजा!! अरे शेकडो वर्षांच्या अंधारानंतर आशेचा पहिला किरण तुझ्या रूपाने उगवतोय, तुला आमचा आशिर्वाद असो!" असं एक पत्रही एकाही पिठाधीशाकडून येऊ नये, हे किती दुर्दैव?!" ते भारावून बोलत होते.

मला वैदिक काळातील ऋषिमुनिंची आठवण झाली. किती मोठा वचक, केवढी अधीसत्ता होती त्यांची भारतीय राजसत्तेवर! कोणीही मुनिवर, महर्षी कुठल्याही राजाच्या दरबाही कधीही येऊन धडकत असे. राजा महर्षींची पाद्यपुजा करी, आणि बसायला आपलं सिंहासनच त्यांना देई! ते मागतील ती गोष्ट राजा डोळे झाकून दान करत असे. मग विश्वामित्रांनी मागितलेलं प्रत्यक्ष जेष्ट पुत्राचं दानही दशरथासारखा चक्रवर्ती सम्राट नकारू शकत नव्हता, आणि स्वप्नात मागितलेल्या राजपाटाच्या दानाचाही विसर राजा हरिश्चंद्राला पडू शकत नव्हता. मात्र शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या वेळीपासूनच उदासिन होत चाललेली ही धर्मसत्ता आता तर पारच कमकूवत झालेली आहे. कांची-कामकोटीच्या शंकराचार्यांना अटक होउनही कुणालाच काही वाटत नाही, आणि ओरीसात स्वामी लक्ष्मणानंदांच्या हत्येनंतरही देशभर शांती राहते. मुळात याचं कारण म्हणजे 'अज्ञान!'

बाबासाहेब पुरंदरेंही याच विषयावर भरभरून बोलले. आपल्यापैकी अनेकांना अरूणाचल प्रदेशची राजधानी कुठली हे देखील माहिती नाही. आणि अरूणाचल प्रदेशवर चिन आपला हक्क सांगतोय, हे तर आपल्या गावीही नसतं. आपण भारत देशाचा विचार करतच नाही. आपल्या स्वतःचा, खुपच खुप आपल्या जातीचा, फारफार तर आपल्या राज्याचा विचार करतो. भारत या राष्ट्राचा विचार आपण का करत नाही? 'आपल्याला काय त्याचं!' हे परवलीचं वाक्यच आपल्याला घेऊन बुडणार की काय! वेळीच सावध व्हायला पाहिजे, बाबासाहेब सांगत होते...

मागे डॉक्टर राममनोहर लोहियांच 'सगुण और निर्गुण' हे पुस्तक वाचण्यात आलं. डॉ लोहीया उत्तरप्रदेशातल्या फैजाबादचे. आणि या माणसाने गोवा मुक्तीच्या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं! कुठे उत्तरप्रदेश, कुठे गोवा! पण तो भारत या माझ्या देशाचा भाग आहे, तो भाग माझ्या देशात आला पाहिजे ही आस्था त्यांच्या ठायी होती. म्हणून देशभरातून सत्याग्रहिंच्या, आंदोलंकांच्या तुकड्या गोव्यात आल्या, आणि गोवा स्वतंत्र झाला. परमपुजनिय गोळवलकर गुरूजींचंही तसंच. ते देशभर असे फीरत जसे काही या भावाकडून त्या भावाच्या घरी पाहूणचाराला जातो आहोत. गांधीजीसुद्धा साबरमती वरून सेवाग्रामला आले. कुठून कुठे स्थायिक झाले. स्वामी विवेकानंद कलकत्त्यावरून कन्याकुमारीला गेले. या लोकांना सगळा भारत देशच आपला वाटायचा. म्हणून भारत देशासाठी या लोकांनी काहीतरी केलं. आपल्याला आपलं घर, आपला मोहोल्ल्या, आपली जात, आणि आपलं राज्य यांच्यातून वेळ मिळेल तर आपण संपुर्ण देशाचा विचार करू ना! धूर्त राजकारण्यांसाठी हे बरंच आहे. लोक जीतके कमी विचार करतील तीतकं त्यांना मेंढरासारखं हाकता येइल. माहितीच नसेल तर विचारच करणार नाहीत. म्हणून मग माहितीच देत नाहीत. अभ्यासक्रम ठरवतात, पण त्यातून चुकीचा ईतीहास शिकवतात. ईंग्रजांनी, मोगलांच्या बखरकारांनी -- म्हणजेच आपल्या शत्रुंनी लिहलेला ईतीहास आपण आज अभ्यासतो. आणि बाबासाहेब पुरंदरेंनी लिहलेला खरा ईतीहास आपल्यातलेच, शिवरायांचेच वंशज असलेले 'मराठा सेवा संघ' खोटा ठरवायला निघालेत.

ईतीहासाची कास धरून ठेवली तरच भविष्याचा वेध घेता येइल. आपण सगळ्यांनी खरा खरा ईतीहास अभ्यासायला पाहिजे. संपुर्ण भारत देशाचा ईतीहास. खर्र्याचा शोध घेऊन माहिती करून घेतली पाहिजे. मी तर प्रयत्न करणार आहे. विष्णू घनश्याम देशपांडे यांच्याप्रमाणे विचार आणि कर्तृत्त्वही करण्याचं सामर्थ्य अंगी यावं, यासाठी बळ देण्याची विनंती ईश्वराकडे करणार्र्या बाबासाहेब पुरंदरेंच्या पायावरती डोकं ठेवून त्यांच्या प्रार्थनेला बळ यावं अशी करूणा मी भाकणार आहे.