4.7.12

गुरूजी, मास्तर, सर आणि जगतगुरू....


गुरूजी...
दातीर गुरूजी आता रिटायर्ड झाले आहेत. दारव्ह्याच्या नगरपरिषद शाळा क्रमांक दोनच्या मागे काही किलोमिटर चालत गेल्यावर लागणा-या त्यांच्या छोट्याश्या शेतात आता ते त्यांचा पूर्ण वेळ देत असतील. या शेतात लावलेली गाजरं उपटून बैलांनी चालवलेल्या मोटेच्या पाण्याच्या धारेवर धूवून आम्ही खात असू. दोन ते तीन या एक तासभराच्या सुटीत गुरूजींनी शेतावर घेवून जावं, म्हणुन त्यांच्या मागे लागत असु. कधीमधी गुरूजीं आमचा हा हट्ट पुरा करायचे, आणि मग  आम्हा काही खास विद्यार्थ्यांची मज्जा व्हायची. पहिली ते चौथीचे माझे गुरूजी -- दातीर गुरूजी!

'माझी शाळा' हा निबंध लिहत असतांना वर्गात मला 'श्री दातीर गुरूजी' शिकवतात, या वाक्यातलं गुरूजींचं नाव मोठं, रंगीत लेखणीने गीरवून लीहायची स्पर्धाच आम्हा वर्गमित्रांमध्ये लागलेली असायची. गुरूजी ईतके आवडायचे. त्यांच्यापेक्षा हूशार, त्यांच्यापेक्षा मोठ्ठा कुणी नव्हताच जगात. ते कोणत्याही प्रश्नाचं उत्तर  अगदी क्षणार्धात देऊ शकतात. कुठलंही गणित लिलया सोडवू शकतात. अगदी काहीही करू शकतात असा आमचा पक्का विश्वास होता. एकदा तर मी त्यांच्या हाती पाटी-लेखण दिली आणि म्हटलं की भारताचा नकाशा काढून द्या!

चौथीची परिक्षा झाली आणि दारव्हा गावच सोडावं लागलं. मग शाळाही. गुरूजींना भेटणं त्यानंतर कधी शक्यच झालं नाही. आयुष्यात काहीतरी बनून दाखवायचं, आणि मगच त्यांच्यापुढे जायचं असं ठरवलं होतं. अजुन ती वेळ यायचीय. पाऊस आलाय. आता गुरूजी शेतावर काहीतरी काम करत बसलेले  असतील. मोटेच्या जागी मोटर लावलेली  असेल. गाजर असतील की नाही आता? परत जायला पाहिजे दारव्ह्याला.
.......

मास्तर...

पुरोहितसर स्वतःचा उल्लेख 'पुरोहित मास्तर' असाच करतात. त्यांना सर वगैरे पेक्षा मास्तर म्हटलेलंच रूचत असावं. माझ्या बाबांना त्यांच्या शाळेत खो-खो शिकवणारे पुरोहित सर मी आठव्या वर्गात गेल्यावर मला ईंग्रजी आणि गणित शिकवतील असं बाबांना कदाचितच वाटलं असेल. पण मलाच काय? माझ्यानंतरच्या बारा बॅचॅसला ईंग्रजी शिकवून पुरोहित मास्तर अजुनही, वयाच्या ऐंशिच्या घरात, अगदी मजेत वावरत असतात. माझ्यासारख्या शेकडो हजारो विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांचाच हा परिणाम असावा.

मी आठवी-नववीत होतो, तेव्हा ते नऊ बॅचॅस घ्यायचे. कधीकधी त्याहूनही जरा जास्त. सकाळी पावणेसहा वाजताची पहिली बॅच! आता वयोमानाप्रमाणे तीनच बॅचॅस घेतात. पण मुलांना ईंग्रजी शिकवणं हीच त्यांना जगण्याचं बळ देणारी उर्जा असावी.

पुरोहित सर जुन्या पद्धतीच्या व्याकरणप्रधान, किंग्ज ईंग्लीशचे पुरस्कर्ते. काळ, क्रियापदाच्या, डायरेक्ट-ईनडायरेक्ट स्पीच च्या चुका झाल्या, क्लॉज जोडतांना काहीतरी चुक झाली की अगदी खोखोच्या मैदानावरच्यासारख्या परमोच्च आवाजात शिव्यांची लाखोळी वाहतांना सरांना कित्येकदा अनुभवलं आहे. आजच्या ट्युशनमध्ये मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे, ही जीद्द त्यांनी आपोआपच मनात भरवली. ईंग्रजी आपल्याला वाटते तेवढी कठीण मुळीच नाही, ती सहज जमणारी, नियमात बसणारी भाषा  आहे असं त्यांच्याच शिकवण्यातून वाटून गेलं. नंतर ईंग्रजी पत्रकारितेत आल्यावर पुरोहित सरांच्या व्याकरणाची गरज पदोपदी भासु लागली, तेव्हा वाटलं की पुन्हा एकदा पुरोहितसरांच्या बॅचमध्ये जाऊन बसावं. क्रियापदं, काळ, आणि क्लॉज शिकावे. आपल्याला आता त्याची खरी गरज आहे. होईल का कधीतरी शक्य? बघुया!
......

सर

प्रसन्न देशपांडे सर सध्या पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ईंग्रजी शिकवतात. यवतमाळचा, आमच्या दाते कॉलेजमध्ये शिकलेला, मग अमरावतीला विदर्भ महाविद्यालयात एम ए केलेला मुलगा, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक झालाय.  अख्ख्या यवतमाळचा  उर अभिमानानं भरून यावा असं हे यश! 'प्रसन्न सर' म्हणजे आडनावाच्या नव्हे, तर नावाच्या समोर 'सर' लावून आवाज देता येणारं पहिलं व्यक्तिमत्त्व. वयात जास्तीत जास्त दहा वर्षाचं अंतर असेल. ईंग्रजीचा अभ्यास स्वतःहून कसा करायचा हे प्रसन्न सरांनी स्वतःच्याच उदाहरणातून दाखवून दिलं. ऑक्टॉबर ते फेब्रुवारी आमच्या ट्युशन्स घ्यायच्या, पैसा जमा करायचा, आणि मार्च ते ऑक्टॉबर पुण्याला राहून नेट-सेट चा, पि एच डी चा अभ्यास करायचा, हा पायंडा प्रसन्न सरांनी पाच वर्ष जपला. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांची निवड झाली तेव्हा कोण आनंद झाला होता म्हणुन सांगु आम्हा सगळ्यांना! अगदी सगळ्याच्या सगळ्यांनी ठरवलं होतं, की प्रसन्न सरांच्या पावलावर पाऊल ठेवून विदर्भ महाविद्यालय अमरावतीला प्रवेश घ्यायचा आणि आपणही असंच काहीसं यश मिळवून दाखवायचं! अनेकांनी ते केलंही, पण कुणालाच जमलं नाही नंतर. शेवटी प्रसन्न देशपांडे होणं ही काही खायची गोष्ट नाही.

प्रसन्न सरांसारखा ईंग्रजीचा साहित्यीकदृष्ट्या, एक ललितवाग्मयाची भाषा म्हणुन केलेला अभ्यास मनाला खुप भावून गेला. ईंग्रजीत आपल्यालाही लिहता येऊ शकतं, कवीता सुचू शकतात, हे सगळं त्यांच्याच सहवासात उमगलं. आज त्या ईंग्रजीत लिहूनच आयुष्याची गाडी सुरू ठेवू शकत आहे. एखादी बातमी झकास झाली, ब्लॉगपोस्ट स्वतःच्याच मनाला भावली, की असं वाटतं की प्रसन्न सरांनी ती वाचावी! आपल्याला काहितरी सांगावं -- एखादी शेलीची, किटसची गोष्ट; ओ हेन्रीच्या शॉर्ट स्टोरिजच्या मागची लॉंग स्टोरी; वर्डस्वर्थ आणि कोलरिजच्या लेक डिस्ट्रीकचं निसर्गसौंदर्य!!
आजवर सगळं लिहलेलं, सर, तुमच्यासाठी घेऊन यायचं आहे. तुम्ही ते वाचता वाचता या सगळ्या गोष्टी आपल्या शैलीत शेअर कराव्या, तुमच्या कडून ऐकतांना परत एकदा ते मंतरलेले दिवस अनुभवावे असं वाटतं. बघू कधी जमतंय़ ते.
......

जगतगुरू...

माउली महावैष्णव संतश्रेष्ठ जगदगुरू श्री तुकोब्बाराय महाराज -- वारकरिकिर्तनाचे भिष्म पितामह श्री बाबामहाराज सातारकर यांच्या ओजस्वी वाणीतून तुकोबांचा असा उल्लेख ऐकला तेव्हापासुन तो कायमचा मनावर कोरल्या गेलेला. नुकताच त्यांच्यावरचा चित्रपटही पाहिला - तुकाराम. शिर्षकही अगदी विचार करून ठेवलेलं. जाणून बुजून संत हे बिरूद काढून फक्त 'तुकाराम' ठेवून दिग्दर्शकाने तुकोबांचा ह्युमन ऍगल यात जपलाय. 

आयुष्यच माणसाला कसं शिकवत, घडवत जातं हे त्यात दिसतं. आयुष्याने दिलेली संकटं, चांगले-वाईट अनुभव आणि विठ्ठलावर असलेली अगाध श्रद्धा यांच्या जोरावर तुकाराम जगदगुरू झाले. आपल्या दैनंदिन जीवनातले कार्यकलाप पुर्ण करून, 'कष्ट करता करता करा देवाचं भजन' या सुत्राचा अबलंब करून देवपद प्राप्त केलेले तुकाराम महाराज अभ्यासक, वाचक, तत्त्वज्ञानी, कवी, दार्शनिक, समाजसुधारक, बुद्धीप्रामाण्यवादी, पुरोगामी आणि  आणखीही बरंच काही होते.
'उच निच काही नेणें भगवंत' हा १३ पदांचा अभंग.. पण अवघ्या वेद पुराण आणि महाकाव्यांचे संदर्भ त्यात येतात. म्हणजेच तुकोबांनी या सगळ्या वाग्मयाचा अभ्यास केलेला असेल. थोडक्यात भक्ती करत बसणे म्हणजे निवळ 'पांडुरंग पांडुरंग' च करत राहणे नव्हे, तर अभ्यास, मनन, चिंतन आणि आत्मसाक्षात्कार आहे, हे त्यांच्या आयुष्यातुन त्यांनी दाखवून दिलं.

.............

दातीर गुरूजी आज दारव्ह्याला आहेत. पुरोहित मास्तर यवतमाळला. प्रसन्न सर पुण्याला आहेत. या तिघांना भेटणं तुर्तास तरी शक्य नाही. जगदगुरू तुकोबाराय मात्र जवळच आहेत. त्यांच्या अभंग अस्तीत्त्वासह.

.