4.4.11

ती नक्की कोण?

भारताने वर्ल्डकप जिंकला होता आणि नागपूर नगरीमध्ये 'न भुतो न भविष्यती' अशी धम्माल सुरू होती. लक्ष्मीनगर चौकापासून ते लॉ कॉलेज चौकापर्यंत जवळजवळ सात आठ किलोमिटरचा रस्ता लोकांच्या गर्दिनी फुलून गेला होता. पाय ठेवायलाही जागा नव्हती. कशीबशी एक चक्कर आजुबाजुच्या गल्लीबोळातून मार्ग काढत मारून आलो. सोबत फोटोग्राफर होता. तो त्याच्या कामात मग्न होता. एकामागोमाग एक फोटो घेत होता. लोक, मुख्यत्त्वे करून तरूणाई बेभान! निमित्तही तेवढंच भारी होतं. पोलीस रस्त्यावर उभे होते. ते सुद्धा आनंद बघत होते. काही ईलाज नव्हता. कुणाकुणाला थांबवणार? नव्वद टक्केच्या वर लोक 'प्यायलेले' होते.

निमित्त विश्वचषकाचं होतं. आनंदाचा क्षण होता. तो सगळ्यांनाच साजरा करायचा होता. विनाकारण लोकांना पकडून रंगाचा बेरंग कशाला करा? या विचाराने पोलीस आपले शांत उभे होते. ऑफीसमध्ये परत आल्यावर आपल्यालाही केवळ जल्लोषाचंच चित्रण करायचंय, असं सांगण्यात आलं. म्हटलं ठीक आहे! आनंद तर होताच! काही लोक प्यायलेले असले म्हणून काय झालं? काही राडा तर कुणीच केला नाही ना? मग झालं तर! आज अट्ठाविस वर्षानंतर आलेला हा क्षण साजरा करतांना थोडी बेपर्वाई होणारच, असा विचार केला, आणि भरपूर गर्दी असलेले फोटोस निवडून 'हिप हिप हुर्रे!' असा एक रिपोर्ट लिहून टाकला. काम रोजच्यापेक्षा लवकरच संपलं. लवकर म्हणजे रात्री दिड वाजता.

आनंदातच घरी परतलो. म्हटलं टिव्ही लावावा, आणि माहोल पहावा! जवळपास दोन अडिच चा सुमार असावा. रूमच्या खिडकीतून समोर दिसणार्र्या फाटकावर कुणीतरी गाडि ठोकल्याचा आवाज आला. खिडकी उघडून पाहिलं. समोरच्या घरात राहणारी मुलगी होती. कदाचित वर्ल्डकप चं सेलिब्रेशन मित्र-मैत्रीणींबरोबर करण्यात तीला वेळेचं भान राहिलं नसावं. घरातले लाईटस वगैरे लागलेले होते. अगदी भाडेकरूंच्या घरातले देखील. यावरून बर्र्याच वेळपासून तीच्या घरचे लोक तिची वाट पहात असतील, किंवा शोधाशोध सुरू असेल, असा अंदाज आला. तीने फाटकावर गाडी ठोकलेली पाहून सगळे चक्रावलेच! तीची आई भरकन फाटकापर्यंत धावत गेली.

"काय झालं गं!?" ती अशी अचानक पडलेली पाहून तीच्या आईने किंकाळीच फोडली. "ईंडिया ईंडिया!!!!" ती चाचपडत उठून बसत बोलली. एव्हाना त्यांच्या भाडेकरूच्या घरातून लोक फाटकाजवळ आले. गाडी उचलून घरात नेली. भाडेकरूच्या घरातील बाईला लक्षात आलं की मुलीने खूपच दारू प्यायलेली आहे. उगाच फाटकाजवळ तमाशा नको, असा विचार करून तीने माय लेकींना घरात नेण्याचा प्रयत्न सुरू केला. "चला काकू आत जाऊन बोलू. दोन वाजून गेले!" असं काहीसं बोलत ती दोघींनाही घरात नेऊ लागली. मात्र ईकडे मुलीच्या आईला खुपच मोठा धक्का बसला होता. आपली ईंजिनियरिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असलेली पोर, मॅच बघायला म्हणून मैत्रीणीच्या रूमवर जाते काय, आणि मॅच संपल्यावरही पाच तासांनी अश्या अवस्थेत परतते काय, हे सगळं त्या बाईच्या विचारशक्तीच्या पलिकडलं होतं.

"दारू प्यायलीस? दारू?!" तीच्या तोंडून शब्दही फुटेनासे झाले होते. "डार्रू नाई मॉम... रम्म! रम्म प्यायले! वि वॉन बेबी!! ईंडिया!!!" मुलगी तर बेभानच झाली होती. तीचं हे रूप तीच्या आईने स्वप्नातदेखील कल्पीलेलं नसावं. शेवटी भाडेकरूंनी दोघींनाही घरात नेलं आणि वाद तेवढ्यापूरता मिटला. नंतर भाडेकरूंच्या घरातले लाईटस बंद झाले. मुलगी पण झिंग येऊन झोपली असावी. आई मात्र गॅलरीतच उभी होती. कदाचित रात्रभर. मग मी देखील खिडकी बंद करून घेतली.

रवीवारी सकाळी मला जाग आली तीच नेमकी माय-लेकींच्या भांडणाने! रात्री तमाशा करणारी लेक असली, तरी सकाळी (ती शुद्धीवर आल्यावर) आईने तीला फैलावर घेतलं असांवं. घराण्याची ईज्जत, माझी ईज्जत, वडिलांचं नाव, सोसायटीत, समाजात छी थू, ईत्यादी विषय बोलून झाले. ती आपली 'सॉरी मम्मी, सॉरी मम्मी' म्हणत होती. शेवटी रागाचा कडेलोट होउन आईने देव्हार्र्यासमोर डोकं आपटून घेतलं. मुलीने आणि वेळेवर घरात आलेल्या शेजार्र्यानी तीला थांबवलं नसतं तर काहीही घडू शकलं असतं. मात्र त्यानंतर सगळं शांत झालं.

सोमवारी गुढीपाडवा होता. मी पहाटे उठून प्यायचं पाणी भरत होतो. काही लोक 'पाडवा पहाट' वगैरे सारखे कार्यक्रम ऐकायला निघालेले दिसले. जरिकाठीच्या साड्या घातलेल्या काही मुलीही होत्या. आश्चर्य वाटलं. या मुलींमध्ये ती देखील होती. नउवारी साडी नेसलेली. गजरा, नथ, बांगड्या घालून अगदी छानसं गंध लावून. घरामागच्याच मैदानातच 'पाडवा पहाट' होती. औत्सुक्यापोटी तीथे गेलो. हो. तीच होती. व्यासपिठावर बसली होती. "आणि आता आपल्यासमोर गीत सादर करत आहे -- अमुक तमुक! (नाव नको लिहायला) -- " घोषणा झाली. तीने गाणं सुरू केलं. "गगन सदन, तेजोमय! तीमिर हरून करूणाकर! दे प्रकाश देइ अभय!" खुप सुरात म्हटलं. टाळ्या पडल्या. एक काका आपल्या पत्नीला हळूच म्हणाले "मुलगी किती घरंदाज आहे! सोज्ज्वळ आहे!" -- "सुंदरही आहे! अगदि साजेशी आहे अवीला!": काकुंनी सरळ मुद्यालाच हात घातला. दोघेही सुचक हसले. नंतरही बरिच गाणी झाली. तीनेही चार-पाच गाणी म्हटली. एकापेक्षा एक सुरात!

तशी ती सुरातच गाते. घरात दिवसभर गातच तर असते काही ना काही. मला ऐकू येतं. तीच्या आईला या गोष्टीचा अभिमान आहे. मुलगी छान गाते म्हणून. तीच्याबरोबर तिची आईपण एखादी ओळ म्हणून पाहते. तीचा कुठे गाण्याचा कार्यक्रम असला, की आई आवर्जुन जाते. आज मात्र तिची आई घरी होती. डोक्याला खुप जखम झाली होती. पट्टी बांधून कार्यक्रमाला गेलो, तर लोकांनी विचारलं असतं -- "काय हो काय झालं??" "हे असं कसं लागलं?!" -- मग काय सांगितलं असतं?

मध्यमवर्गिय घरातील एक मुलगी. आपली संस्कृती, आपलं संगित हे लहानपणापासून मनावर रूजवलेलं! पण कॉलेजच्या पहिल्याच वर्षाला गेल्यावर एकदम रम पिऊन तमाशा करण्याची लहर आणि हिम्मत कशीकाय होते? ती खरी कोणती? शनिवारी रात्री दोन वाजताची की सोमवारी सकाळी साडेसहावाजताची? "मी रम्म प्यायल्लीय!!" असं आईला ओरडून सांगणारी, की "दे प्रकाश देई अभय" ही ओळ सुरात म्हणणारी? आपल्या थ्री फोर्थ जिन्स आणि तोकड्या टिशर्टचंही भान नसलेली की नऊवारी साडित नथ सांभाळत गाण्याच्या कार्यक्रमाला जाणारी? ती रात्री दोन वाजेपर्यंत मित्र-मैत्रीणींबरोबर मद्यधुंद सेलिब्रेशन करणारी की घरंदाज, सोज्ज्वळ आणि अवीला साजेशी असणारी?

ती नक्की कोण?