28.6.12

वारीत चाललो मी...


सध्या वारीच्या फोटोंनी फेसबुकच्या भिंती, वृत्तपत्राची पानं, आणि भावीकांची मनं भरून गेलेली आहेत. आषाढी एकादशी -- महाराष्ट्राचा राष्ट्रीय लोकोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. वारीतील उभे रिंगण, गोल रिंगण, माउलींच्या पालखीबरोबर टाळ-मृदंगाच्या गजरात चालणारे हजारो भावीक, मानाचा  अश्व, तुळशीवृंदावनं डोक्यावर घेऊन झपझप चालणा-या लाल-केशरी लुगड्यातल्या स्त्रीया, पताका, टाळ मृदंग घेऊन 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या गजरात तालबद्धरित्या पुढे जाणारे पांढ-या कपड्यातले वारकरी, भजन, किर्तन, नामाचा गजर, आणि अवघ्या वातावरणात भरलेला पांडूरंग! वारीची जादू पंढरपूरपासुन अगदी शेकडो किलोमिटर दूरही जाणवतेय ईतकी वारी महाराष्ट्राच्या, आपल्या मराठी जनमनाचा अविभाज्य भाग झालेली आहे.

आळंदी आणि देहू येथून येणा-या माऊलींच्या दोन महत्त्वाच्या पालख्या, शिवाय अगदी शेकडो खेड्यांपाड्यांतुन येणारी भावीकांची रिघ, अगदी आंध्रप्रदेश, कर्नाटकातूनही येणा-या वा-या, वारीच्या उत्साहाचा अभ्यास आणि अनुभव करण्यासाठी जगभरातून वारीत सामील होणारे लोक, हे सगळं पाहिलं, वाचलं, की पुढच्या वर्षीची वारी आपणही करून यावी असं वाटून जातं. अनेक वर्षापासुन असं वाटत आलेलं आहे. अजुन मात्र वारीत जाण्याईतपत पुण्य खात्यावर जमा झालेलं नाही, असंच म्हणावं लागेल. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं हे या आधीही अनेकदा केलंय. कमी गर्दीच्या दिवसांत अगदी तासाभरात दर्शन होवून बाहेर आल्यावर देवळाच्या सभामंडपात 'रूप पाहता लोचनी' म्हणणा-या वारक-यांच्या समुहाबरोबर उभं राहून टाळ्याही वाजवल्या आहेत. 'याची देही याची डोळा' विठठलाची मुर्ती पाहिलीअगदी पायांना हात लावून दर्शन घेतलं, गाभा-यात क्षणभर उभं राहून 'तुळशिहार गळा कासे पितांबर' असं ते रूप डोळ्यात भरून घेण्याचं सौभाग्यही उपभोगलंय. पण वारी करून केलेलं विठूरायाचं दर्शन अजुन नशिबात आलेलं नाही.

आषाढी एकादशीला पंढरपुरात अगदी लक्षावधी विठ्ठलभक्तांचा मेळा लागलेला असतो. दोन दोन दिवस रांगेत उभे राहण्यात जातात, आणि कधीतरी द्वादशिला, त्रयोदशिला दर्शन मिळतं, असं लोक सांगतात.  आषाढी एकादशीचा मुहुर्त साधण्यासाठी केलेला हा वारीचा अट्टहास, काही हजार भाविकांचाच पुर्ण होत असावा. ईतर लाखो लोक पंढरीचं, चंद्रभागेचं, कळसाचं किंवा जो देवळात दर्शन घेऊन आलाय, त्याचं दर्शन घेऊनच स्वतःला धन्य मानतात. मग ईतका मोठा व्याप, पायी चालण्याचे एवढे कष्ट, का म्हणून करायचे? बरं पायी निवळ चालत राहणं म्हणजेच वारी नव्हे! रिंगणामध्ये हाती असेल नसेल तेवढ्या जड-हलक्या वस्तू घेऊन धावावं लागतं! माउलींची पालखी विसाव्याला खाली ठेवल्या शिवाय वारकरी खालीही बसत नाहीत!! वारक-यांची स्वतःची संघटना आहे, त्यांचे नियम, अटी आहेत, त्यांचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे!! कधीमधी अचानक ढग दाटून येतात, मुसळधार पाऊसही येतो!! तश्यातही चालत रहावं लागतं. वारी करणे म्हणजे काही गम्मत नाही. खेड्यापाड्यात बारा महिने अठरा काळ कष्टाची कामं करणारी भावीकमंडळीच हे दिव्य करू शकतात. एक मात्र खरं की वारीत कुणालाच थकवा येत नाही! अगदी साधे वारीचे फोटो पाहिले तरी आपल्याला आलेला शिणही कुठच्या कुठे पळून जाईल ईतकी ताकद त्यामध्ये  असते. पांडुरंग या काळात पंढरपूरच्या त्या देवळात नसतोच. तो तर वारीतच कुठेतरी चालत, नाचत, धावत असावा. हो! म्हणुनच रिंगणामध्ये धाव धाव धावूनही भावीक थकत नाहीत. शेकडो किलोमिटरचा प्रवास पायी चालत करूनही त्यांना शिण येत नाही. दर्शन होवो अथवा न होवो, त्यांना कसलीच पर्वा रहात नाही. वारीत चालतांना सगळ्यांची ओळख असण्याचीही गरज नसते. सगळेच माऊली! एकमेकांच्या पायांना हात लावून नमस्कार करायचा! सोशल नेटवर्कींगचा हा उच्चतम स्तर नव्हे का?

ईतका मोठा प्रवास निवळ चालत करत राहिलं तर किती निरस वाटलं असतं ना? म्हणुन मग रिंगण करण्याची कल्पना आली असावी. चालून चालून अंग अकडून जाऊ नये म्हणुन विठूनामाच्या तालावर भावीक पारंपारिक उड्या मारतात, पावलांची विषिष्ट पद्दतीने हालचाल करून नृत्य करतात, हे सगळे एरोबिक्सचे, रिलॅक्सेशनचे व्यायामप्रकारच नव्हेत का?

रात्रीच्या वेळी किर्तन होतं. किर्तनात आख्यानामध्ये भक्त-भगवंताची कथा रंगवली जाते. म्हणजे थोडक्यात गोष्ट सांगीतली जाते. गजर केला जातो. स्ट्रेस मॅनॅजमेन्टचा हा सर्वात सोप्पा आणि प्रभावी प्रकार नव्हे का? कॅंटरबरीच्या छोट्याश्या यात्रेत भाविकांनी एकमेकांना सांगीतलेल्या गोष्टीचं कॅंटरबरी टेल्स नावाचं जसं भलंमोठं अजरामर साहित्य निर्माण झालं, तसंच शेकडो वर्षांपासुन अविरत चाललेल्या वारीत संत-वारक-यांनी केलेल्या किर्तनांच्या आख्यायिका बनल्यात. संतांनी दुर्बोध वेद-पुराण आणि महाकाव्यांच्या सुबोध लोककथा बनवल्या. लोककथांतून लोकमानस बनलं. आणि त्यातून अवघा महाराष्ट्र घडला. व्हॅल्यु एज्युकेशन, मास अवेकनिंग, आणि लोकसहभागातून विकास वगैरेंच्या सा-या कल्पना अवघा महाराष्ट्र घडवणा-या या वारीपुढे थीट्या नाही का वाटत?

म्हणुन वारीत जाणं म्हणजेच विठ्ठलाला भेटणं! जीवन घडवणारी, मन प्रसन्न करणारी, वर्षभराच्या कष्टाच्या कामासाठी उर्जा देणारी वारी म्हणजेच विठठल होते. देवळात पुंडलीकानं भिरकावलेल्या विटेवर 'युगे अठठावीस' उभा असलेला विठठल वारीतल्या भावीकांनी ज्या जागी विट भिरकावली, त्याच जागी येऊन विटेवर उभा राहतो. सर्व भक्तांना पुंडलीक बनवणा-या या वारीच्या परंपरेलाच जोहार करावा! विठ्ठलापर्यंत तो आपोआपच पोचेल.


19.6.12

ये शिवाजी क्या सरदार था क्या?


ऍलन मॉर्डे तीसेक वर्षाचा आहे. जन्मापासुन आणि गेल्या कित्येक पिढ्यापासुन नागपूरचाच रहिवासी आहे. फ्रेन्डस कॉलनी मध्ये त्याचं पिढीजात घर आहे, आणि रामदासपेठमध्ये एक छोटासा फिटनेस स्टुडिओ चालवतो. गेल्या पाच सहा वर्षात नागपूरमधला अग्रगण्य फिजिकल ट्रेनर म्हणुन त्यानं नाव कमावलं आहे. फिटनेसबद्दलचा त्याचा अभ्यास अवाक करणारा आहे. ईंग्रजी गाणी, फिटनेसवरची पुस्तकं, घरी पाळलेली सहा सात वेगवेगळ्या जातीची कुत्री, त्यांची काळजी घेण्याच्या टिप्स, फेसबुक, या सगळ्यांमध्ये रमणारा, आणि रोज शेकडो प्रकारच्या शेकडो लोकांना भेटणारा ऍलन. माझ्या सेलफोनमधील छत्रपती शिवाजीमहाराजांचा वॉलपेपर पाहून 'यार ये शिवाजी क्या सरदार था क्या?' असं तो विचारेल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. 

सुरूवातीला जरा धक्काच बसला. 'सरदार?'. आधी वाटलं की आदिलशहा, निजामशहाचा सरदार, किंवा मराठ्यांच्या मावळातील 'सरदार-उमराव' या अर्थाने त्याने 'सरदार' म्हटले असेल. पण तसं नव्हतंच. 'सरदार' म्हणजे पंजाबी, शिख योद्धा या अर्थाने त्याने विचारलं होतं. 'सरदार नही. मराठा थे!,' मी त्याला सांगीतलं. थोडं रागातच. 'काय मुर्ख माणूस आहे? एवढंही नाही माहिती?!'

'पर सरदार लोग ऐसे तलवार वगैरा ले के रहते है ना. और दाढि भी...' त्याने आपला तर्क सांगीतला. मला आणखी एक आश्चर्याचा धक्का. कमाल आहे! मग माझ्यातला मराठी माणूस जागा झाला.
महाराजांच्या दाढी राखण्यामागचं रहस्य, जगात ते झाले त्यामुळेच आज मी हिंदू आणि  ऍलन ख्रिश्चन म्हणुन राहतो आहोत नाहीतर सरसकट सगळे मुसलमान झालो असतो, ही आणि ईतर सगळी गोष्ट, जीतकी सहज करून सांगता येईल तीतकी त्याला सांगीतली. तो मन लावून ऐकत होता. आपण हे कधीतरी शाळेत वगैरे वाचलंय हे त्याला पुसटसं आठवत असावं. पण बहुतेक करून सगळं त्याच्यासाठी नवीनच होतं. त्याला बाय करून निघतांना माझ्या मनात आलं, की याच्यासारखे किती असतील?

ऍलन बावळट मुळीच नाही. तो अशिक्षीतही नाही. आपल्या क्षेत्राचं त्याचं ज्ञान अफाट आहे. आपल्या धर्माचंही असेल. आहेच. म्हणुनच त्याने त्याच्या स्टुडिओमध्ये एक मोठा क्रॉस लावला आहे. त्याखाली लीहलंय 'नो पेन, नो गेन'. क्रॉसचा वापर जीममध्ये ईतका कल्पकपणे करणा-या माणसाला शिवाजी महाराजांबद्दल जुजबी माहितीही नसावी? आश्चर्य अजुनही वाटतंय.

मी स्वतःचं लहानपण आठवलं. ख्रिसमसची सुटी असली, किंवा गुड फ्रायडेला सुटी असली, की आज नेमकी का म्हणुन सुटी आहे, हे माझ्या घरचे लोक मला समजावून सांगायचे. अगदी ईत्यंभूत. गुरूनानक जयंतीच्या दिवशी कुणाचा जन्म झाला होता? गुरू नानक कसे महान होते, हे देखील आईने त्यांच्या गोष्टी सांगुन समजावलं आहे. ईदच्या दिवशी चंद्राचं महत्त्व, "ती बघ ईदेची चंद्रकोर" अगदी गच्चीवर नेऊन 'चांद-तारा' दाखवत बाबांनी मला समजावल्याचं आठवतं. प्रेषित पैगंबरापासुन ते करबलापर्यंतच्या गोष्टी मामाने सांगीतल्या आहेत. भगवान बुद्ध असो किंवा वर्धमान महावीर तर दूस-या कुठल्या धर्माचे नसुन आपलेच संत असल्यागत त्यांचं चरित्र शिकवण्यात आलं. येशुख्रिस्तावरची एक सिरिअल मधल्या काळात दुरदर्शवर यायची. त्यातली तर गाणी मी पाठ केली होती. जसे आपले देव आहेत, तसेच ते देखील देव आहेत, असाच संस्कार मनावर झालेला. ही चरित्रं अभ्यासक्रमातही नंतर कधीतरी कुठेतरी ओझरती आलेली. पण घरी सांगीतलेल्या गोष्टींमुळे हा  अभ्यासही मग सोपा झाला होता. माझ्यासारख्याच अनेकांचा अनुभवही असाच असेल.

मग ऍलन मॉर्डेला नसेल सांगीतलं का त्याच्या आईबाबांनी शिवाजी महाराजांबद्दल? कदाचित नसेल सांगीतलं. केवळ तो ख्रिश्चन आहे म्हणुन नाही. तर मुळातच अनेकांना आपल्या कामाची गोष्ट नाही मग सांगुन काय करायची, किंवा मग माहिती करून काय फायदा? असं वाटतं. म्हणुन. त्याला त्याच्या फिटनेसच्या क्षेत्रातलं अद्ययावत ज्ञान देण्यासाठी त्याच्या मोठ्या भावानं कित्येक फिटनेस जर्नल्सचं नियमित सबस्क्रिप्शन घेतलं आहे. लहान भावाने 'ऍलन फिटनेस स्टुडिओ' नावाची फेसबुक कमुनिटी उघडून दिली आहे. कुत्र्यांवरची पुस्तकंही तो नियमित वाचत असतो.

हे सगळं त्याला उपजीवीकेचं साधन द्यायला पुरक ठरणार म्हणुन. पण शिवाजी महाराज त्याला माहिती नाहीत. भोसल्यांच्याच नागपूरात तो पिढ्यानपिढ्यापासुन राहतोय, पण भोसले कोण? हे तो सांगु शकणार नाही. चमकदार झेंडे घेऊन बॅण्ड वाजवत जाणा-या मुसलमान लोकांच्या समुहाला उर्स म्हणतात एवढं त्याला माहिती आहे,  पण हा उर्स का निघतोय? हे त्याला सांगता आणि समजताही येणार नाही. ऑक्टोबर महिन्यात दिक्षाभुमीवर गर्दी होते हे त्याला माहिती आहे, पण नक्की का? हे सांगता येत नाही. बडगे, मारबती, रामनवमीची शोभायात्रा, चेट्रीचंद, महावीर जयंती, अग्रसेन जयंती, महेश नवमी, बिरसा मुंडा जयंती, गुरू अर्जनदेवांचा बलिदान दिवस, हे सगळं आजुबाजुला घडत राहतं. ईतके वर्षापासुन. पण हे का घडतंय हे त्याला माहितीच नाहीय.

खरं सांगायचं तर हे एक एका दिवसाचे सण, उत्सव. पण प्रत्येकामध्ये एक एक संस्कृती, एक एक समाज, एक एक जीवनपद्धती दडलेली आहे. त्याचप्रमाणे शिवाजी महाराज असोत, किंवा भगवान महावीर असोत, किंवा बिरसा मुंडा असो, महाराणाप्रताप असो, सेंट झेविअर असो, किंवा राजा दाहिरसेन असो, या सगळ्या एक एक व्यक्ती  असल्या तरी त्यांच्यामध्ये एक  अवघा समाज, अवघी लोकपरंपरा दडलेली आहे. ह्या सगळ्यांबद्दल माहिती असणा-या मला त्याचा किती फायदा होईल किंवा होणारही नाही, हे अलाहिदा, पण या सगळ्यांपासुन अनभिज्ञ असणा-या ऍलन मोर्डेसारख्या लोकांचा नकळतपणे मोठा तोटा होतो आहे, हे नक्की.

सगळ्या धर्माच्या लोकपुरूषांबद्दल, भारतातल्या सर्व समाजांतील राष्ट्रपुरूषांबद्दल, सर्व धर्म-पंथांच्या वेगवेगळ्या परंपरांबद्दल ते आपल्यासारख्यांचेच, नव्हे आपलेच असल्याची खात्री देत मला अवगत करवणा-या माझ्या कुटुंबाचा मला अभिमान वाटून गेला. माझ्यासारखी माणसं भेटली असती, तर ऍलन एक चांगला ट्रेनर तर झालाच असता, शिवाय 'ये शिवाजी क्या सरदार था क्या?' असा प्रश्नही त्याच्या डोक्यात कधीच आला नसता.

12.6.12

माणसांचं गाव. गावचं माणूस.

रात्रीच्या बसनेच घरून निघायचं ठरवलं. म्हणजे सकाळपासुन दिवस मोकळा मिळतो. नाहितरी रात्रभर घरी थांबुन करणार काय? झोपायचंच आहे! त्यापेक्षा तेवढ्या वेळात नागपूरला पोचता येणार होतं. त्यातला त्यात पहिला पाऊस आलेला. गावातल्या हवेतला ओलावा काही सहजासहजी पाय निघू देत नाही. नेमकं जायच्या वेळलाच सगळंकाही एकत्रपणे होतं -- पाऊस, मित्रांचं येणं, जेवायला उशीर, आणि लाईन जाणं, अंधार! पण तरीही तयारी केलीच.

पावणेदहा वाजता बसस्टॅंडवर पोचलो. नांदेड-नागपूर लांब पल्ल्याची गाडी. खिडकीजवळची जागाही मिळाली आणि मस्त थंड हवाही. पंधरा मिनिटात झोप येणार ह्याची खात्री झाली. पण कमीतकमी तिकिट घेइपर्यंत तरी जागं राहणं आवश्यक होतं.

"नागपूरला कधी पोचायची गाडी?" खच्चुन भरलेल्या बसमध्ये तिकिटं देण्यात गुंतलेल्या कंडक्टरला एका प्रवाशानं विचारलं. "साडेतीन तास लागते," कंडक्टरने तडक आणि कडक उत्तर दिलं. "अर्ये बापरे! बरंच दूर आहे म्हणायचं," खिडकीच्या बाहेर बघत प्रवासी स्वतःशीच बोलला. "दिडशे किलोमिटर आहे. दिडशे!" त्याच्या बाजुला बसलेल्या दूस-या प्रवाशाने त्याच्या ज्ञानात भर पाडली. त्यानंतर यवतमाळ-नागपूर प्रवासादरम्यान लागणारी गावं, नागपूरला नेमकं कुठे उतरल्यावर सोयिचं होईल, नागपूरवरून पुढे जाण्यासाठी कोणती गाडी किती वाजता मिळेल, ईत्यादी विषयांवर त्यांची चर्चा रंगली.
यवतमाळ-नागपूर मार्गाबद्दल अगदीच अनभिज्ञ असलेला माणुस मी बरेच दिवसांनी पाहिला. या माणसाला कळंब, देवळी, बुटिबोरी वगैरे गावांची नावंही माहिती नव्हती. वर्धा जिल्हा आहे. शिवाय रेल्वेस्टेशन. त्यामुळे ऐकुन थोडीफार माहिती होती. बोलण्याच्या पद्धतीवरून तो लातुर उस्मानाबादकडचा वाटत होता. "महाराष्ट्रात राहणा-या माणसांना महाराष्ट्राबद्दलच पुरती माहिती नाही! काय विचित्र परिस्थीती आहे!" असा विचार मनात आला. मग आपल्याला तरी किती माहिती आहे? असा प्रश्नही आला. आणि मग लक्षात आलं की मागच्या महिन्यात कोल्हापुरला गेलो होतो तेव्हा आपलीही अवस्था अशीच झाली होती.

पंढरपूरवरून कोल्हापूरला जायला किती वेळ लागतो? कोल्हापूरवरून गोंदवल्याला सातारा की क-हाड -- नेमकं कुठून जावं लागतं? कोल्हापूरवरून मुंबई आणि उपनगरांकडे जाणा-या बसेस नक्की साता-याला जातात ना? सगळी माहिती इतरांना विचारूनच काढली होती. दहिवडी, म्हसवड ही गावांची नावं अगदीच नवी होती. नेमकं कुठलं गाव आलंय? आणि ईथे गाडी किती वेळ थांबणार! याचा पत्ताच नसायचा. लातुर, उस्मानाबाद, तुळजापूर, सातारा, क-हाड, या शहरांबद्दल ऐकुनच सगळं माहिती होतं. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, मराठी म्हणवतो, त्या आपल्या राज्याबद्दल आपल्याला किती कमी माहिती आहे? आपण खुपच मोठे मुर्ख आहोत. असा विचार मनात आला.

असो. फार माहिती नसली, तरी आपल्याला बरिच माहिती आहे देखील्! निदान विदर्भाबद्दल तर आहेच. यवतमाळ-अमरावती-अकोला-नागपूर-चंद्रपूर- बस! विदर्भात अकरा जिल्हे. त्यापैकी एवढेच आपण पाहिले. त्यातल्या त्यात यवतमाळ-अमरावती आणि नागपूरच ब-यापैकी माहिती आहे. बाकी ठीकाणी काय - एक दोन धावत्या भेटी! म्हणजे एवढीही माहिती नाही?!

असो. निदान आपल्या यवतमाळ जिल्ह्याबद्दल तर आपण खुपकाही जाणतो. दारव्हा, पुसद, उमरखेड, याव्यतिरिक्त चौथ्या कुठल्याच गावात रहायला गेलेलो नाही. नेर, दिग्रस, मारेगाव, राळेगाव, महागाव, घाटंजी, बाभुळगाव, पांढरकवडयाला अध्येमध्ये कधीतरी एक-दोन दिवसाची भेट. कसल्याश्या वादविवाद-वक्तृत्त्व स्पर्धेच्या निमित्ताने किंवा एखाद्या छोट्याश्या कामाच्या निमित्ताने. याशिवाय झरी-जामणी वगैरे तालुका नक्षलग्रस्त आहे एवढंच माहिती आहे. म्हणजे यवतमाळ आपला जिल्हा असुनही प्रत्यक्ष अनुभव फारच थोडा. अधीकच शरम वाटली.

पण म्हणुन काय झालं? यवतमाळ शहर,  आपलं जन्मगाव! निदान या शहराची तर गल्ली-न-गल्ली आपण ओळखतो. ईतपत विचार सुरू असतांना बस शहराच्या बाहेर आली होती. नवीन बायपास रोडच्या आजुबाजुला आता फ्लॅटस तयार होत आहेत. छोट्या टाऊनशिप्स. अरेच्या! हे तर माहितीच नव्हतं. गाव सोडून पाच वर्ष झालीत. किती बदललं असणार सगळं. पुढेही बदलत राहिल. म्हणजे आपल्याला आपलं गावही पुरतं माहिती नाही. अरेरे!

मग मोजणीचं एकक आणखी एक घर खाली आणलं. आपल्याला आपलं घर पुर्णतः माहिती आहे. अगदी प्रत्येक कोपरा-न-कोपरा! पण यात काय मोठी गोष्ट आहे? घर आहेच असं केवढं? पण काहीही असो. घर आपल्याला आपलं वाटतं. पुर्ण माहिती आहे म्हणुन नाही, पण त्यातली माणसं आपली आहेत म्हणुन. माणसंच कश्याला? त्यातले कोपरे, त्यातली झाडं, झाडावरची घरटी, त्यातले पक्षी सगळे आपल्याला आपले वाटतात. आपण घराला, घरातल्या सजीवनिर्जीवाला आपलं मानतो म्हणुन घर आपल्याला माहिती होतं.

थोड्याफार फरकाने तसंच काहीसं मुळगावाचंही. यवतमाळ आपलं वाटतं कारण या गावातले लोक, शाळा, कॉलेज, रस्ते, मैदानं, दूकानं, सगळं आपलं वाटतं. फिरायला निघालो तर चार जण ओळखीचे भेटतात म्हणुन गाव आपलं. म्हणजे शेवटी माणसांमुळेच आपलेपण येतं. अनोळखी प्रदेशाचा अवघा नकाशा आणि गल्ली-न-गल्लीची खडा-न-खडा माहिती असणारं पुस्तक, किंवा तसा एखादा रोबोट जरी बरोबर घेऊन फिरलं, तरीही तो प्रदेश आपला वाटत नाही. कारण? सरळ आहे. माहिती कितीही असली, तरी माणसं आपलीशी झाल्याशिवाय प्रदेश आपला होत नाही.

आणि माणसं आपलीशी केली की मग सगळंच आपलं होतं. कोल्हापूरहून गोंदवल्याला जायचं असेल तर साता-यापेक्षा क-हाड मार्गाने जा, असा मोलाचा सल्ला देणारा तो कंडक्टर; क-हाडवरून सरळ दहिवडीची गाडी पकडा आणि त्या मार्गाने गोंदवल्यासाठी निघा असं सांगणारे ते गृहस्थ; दहिवडीवरून म्हसवडला जाणा-या बसमध्ये बसा, म्हणजे गोंदवल्याला सरळ जाता येइल, असा सल्ला देणारा तो शाळकरी मुलगा; आणि माझ्या बसमधल्या माणसाला यवतमाळवरून नागपूर दिडशे किलोमिटर आहे असं सांगणारा तो बाजुचा माणूस; ही सगळीच माणसं अनोळखी गावाला आपलंसं करण्याचे सोबती ठरतात.

गाव, त्यातलं अंतर, त्याचं वैषिष्ट्य, त्याचं वैगुण्य, सगळं काही माहिती होतंच. बस, माणसांना बोलतं करण्याचं, माणसांना माहिती करून घेण्याचं कसब जवळ असलं पाहिजे.

5.6.12

तुझी आठवण येते...

या आठवणींच्या भरवश्यावरच अवघं आयुष्य काढून टाकण्याच्या बाता जेव्हा मारल्या, तेव्हा ते सगळं खुप काव्यमय, एकदम आदर्श ईमोशनल वगैरे वाटलं होतं. सोबत घालवलेले हे सुंदर क्षणच आयुष्यभर पुरतील वगैरे बोलतांना खरंच अशी वेळ आल्यावर किती अवघड जाईल (अवघड म्हणजे खुपच साधारण शब्द आहे ईथे. जीवघेणं  वगैरे म्हणायला पाहिजे) याची कल्पना नव्हती. आता या आठवणी सगळ्या बोहा-या वाटू लागल्या आहेत. आपल्याला विस्मरणाची देणगी लाभली आहे असं म्हणतात. रट्टू मारून जसं पाठ करतो, तसं काहीतरी करून विसरून जाण्याचं तंत्र असायला हवं होतं.

आठवणींचीच सगळी कटकट आहे. गुळगुळीत आणि मोकळ्या रस्त्यावर बिन्दास्त गाणं म्हणत गाडीवर जात असतांना  अचानक समोर मांजर आडवं जावं अशी भक्कन आठवण येते. कुठेही. अगदी काही ध्यानिमनी नसतांना. मग आपण रस्त्यावरून चालणं तर सुरू ठेवतो, पण मांजर आडवं गेल्याचं काही बराच वेळ डोक्यातून जात नाही ना; अगदी तसंच आपलं सगळं काम सुरू राहतं, पण आठवण काही डोक्यातून जात नाही. मांजर आडवं गेल्याने काहीच होत नाही, हे माहिती असुनही मनात एक हूरहूर कायम राहतेच, त्याचप्रमाणे आठवण काढून काहीच फरक पडणार नाही, हे माहित असुनही आठवणीची कूरकूर कायम राहतेच. आणि मग एकातून दूसरी, दूस-यातून तीसरी. आठवणीची लिंकही अपार लागते. विनाकारण  आठवणी तयार करून ठेवल्या असं वाटतं. आणि यांच्या भरवश्यावर म्हणे पुढचं अवघं आयुष्य़ घालवणार होतो! किती मोठी बेवकुफी! 

ही कटकट नसतीच तर किती बरं झालं असतं? माणूस ब्लॅंक! अगदी बिन्धास्त! मग काय केलं असतं? मग एकटं बसुन राहता आलं असतं का तासनतास?  गज़ल ऐकताना डोळ्यात पाणी आलं असतं का? कवीता वाचतांना ती 'क्या बात है' म्हणुन थेट मनाला भिडली असती का? कॅनव्हासवरचा गडद होत जाणारा रंग आणि पुसट होत जाणा-या प्रतीमा -- चित्रकाराने समजावून न सांगताही त्याचा अर्थ लावता असता का? नाटकातला, किंवा सिनेमातला सगळ्यात महत्त्वाचा 'बेस्ट झालेला' तो सीन -- ज्यात कुणीच एकमेकांशी काहीच बोलत नाही, पण न बोलताच सगळं सांगुन जातात -- तो पाहून डोळ्याच्या कडा पाणावल्या असत्या का? भैरवीचा टिपेचा स्वर लावतांना नकळत समाधिस्त होणा-या गायकाबरोबर मलाही त्या अवस्थेचा अनुभव आपोआप आला असता का?

आठवण कटकट असेलही कदाचित. पण त्यामुळे शरिरात फक्त मेंदूच नाही तर हृदयही  असतं, याची जाणीव होत राहते. आठवण अशीच येत राहिली तर मेंदूबरोबर हृदयही सुरू राहिल. आठवण जगवेल, आयुष्य आहे तोवर.  

या आठवणींच्या भरवश्यावरच अवघं आयुष्य काढून टाकण्याच्या बाता जेव्हा मारल्या. अगदीच खोटं नव्हतं ना ते?