8.12.11

असेन मी... नसेन मी!


काय झालंय कळत नाही! असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे! आज अचानक आठवल्या या ओळी. याआधी कितीतरी वेळा ऐकलेलं गाणं! पण आज अचानक आठवलं परत! आज परत ऐकलं ते गाणं! डोळ्यातून पाणी येत नाहीय; पण असं वाटतंय की खुप रडत आहे मी!

अरूण दातेंच्या आवाजात हे गाणं काही दिवसांपुर्वी लाईव्ह ऐकायला मिळालं होतं. नागपूरच्या एका कार्यक्रमात ते मुलाबरोबर आलेले होते. दाते साहेब आता पंचाहात्तरी पार आहेत. अजुनही लाईव्ह शो मध्ये ते गातात आणि आजही आवाजात तोच रेशमी स्पर्ष आहे. हे एक आश्चर्यच नाही का! गाता गाता जावे आणि जाता जाता गावे - अशीच ईच्छा असल्याचं ते म्हणाले. मी विचारलं होतं त्यांना, की काहीतरी राहून गेल्याची खंत आहे का मनात? प्रश्न अनपेक्षीत असावा त्यांना! बराच विचार केला त्यांनी आणि मग एकदम स्पष्टपणे सांगीतलं - 'नाही! काहीच खंत नाही!' खुप छान वाटलं ते ऐकुन. त्यानंतर त्यांचं गाणं ऐकतांनाही 'असेन मी नसेन मी' च्या वेळी काहीतरी वाटलं होतं. मात्र आजच्याईतकं नाही!

अरूण दातेंची गाणी मी किती पाठ केली होती लहानपणी! या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे! आईचे एक मामा होते - बाबा मामा! ते अरूण दातेंसारखेच दिसायचे. म्हणुन मी अरूण दातेंना बाबा आजोबा म्हणायचो तेव्हा. त्यांची गाणी म्हणुन दाखवून मी कितीतरी वेळा भाव खाल्ला आहे. तेव्हा गाणं म्हणता यायचं, त्यातला अर्थ किंवा भावार्थ कळायचा नाही. तो कळायला लागला, आणि समजलं की आपण कितीही काही केलं तरी फक्त गाणं म्हणु शकतो; गाणं गाऊ शकत नाही! पण म्हणुन काय झालं? गाणं ऐकू तर शकतोच ना! मग ऐकायला लागलो खुप मन लावून! आणि मग समजलं, की ऐकण्यात तर गाण्याहून जास्त थ्रील आहे. हे थ्रील नेहमीच वाटत आलेलं. मात्र आजच्याईतकं नाही!

शांता शेळकेंचे हे शब्द. त्यांचं याच नावाचं आत्मचरित्रही आहे. डोक्यावरून पदर घेतलेला त्यांचा हसरा फोटो त्यावर आहे. असे शब्द लिहणारे लोकही खुप अलौकीक असतात. किती सहज किती मोठी गोष्ट भरकन लिहली जाते त्यांच्याकडून. शांन्ता शेळकेंची पैठणी नावाची कवीता मला आठवली. आठवीत की नववीत असतांना मला होती ही कवीता. वाचल्यानंतर तेव्हा काहीतरी वाटलं होतं. असंच काहीसं! रडू आल्यासारखं. आजही "कधीतरी ही पैठणी, मी धरते ऊरी कवळुन! मऊ रेशमी स्पर्शामध्ये, आजी भेटते मला जवळुन" सारखी ओळ आठवली की तसंच काहीसं वाटतं. थेट रडू आणण्याईतक्या ताकदिचे शब्द कसे सुचत असतील या लोकांना! 'असेन मी नसेन मी' हे गाणंही मुळात अश्याच ताकदिने भरलेलं आहे.

त्यातल्या त्यात ही भैरवी आहे. भैरवी मुळातच तर मनाला भीडणारा सुर! त्यात हे शब्द आणि दाते साहेबांचा अढळ स्वर! हे निर्वाणीचं गाणं आहे. भैरवीचे सुर आहेत. गाण्याच्या अंत-यात खुप जास्त वेदना आहेत, निरोप घेतानाच्या! पण 'असेन मी नसेन मी' या मुखड्यावर गाणं परत हसरं होतं. जणु काही काठोकाठ पाण्यांनी भरलेल्या डोळ्यानी आपल्याकडे पहात, आणि त्याच वेळी ओठावर हसु आणत आपलं कुणीतरी जवळचं माणुस आपला निरोप घेतंय! मात्र हे हसू जबरीने आणलेलं किंवा आपल्याला बरं वाटावं म्हणुन मुद्दाम आणलेलं नाही. ते मनापासून आलेलं हसू आहे. आणि डोळ्यातले आसुही मनापासून आलेले आहेत. ईतकं सगळं एकाच वेळी वाटतं की ते शब्दात मांडता येत नाही. मग रडू येतं.

पण माहिती नाही, आज डोळ्यातून पाणी आलं नाही! असं वाटत राहिलं की खुप रडू येइल! डोकं जड झालं. बोटं आपोआप किबोर्डवर चालायला लागली. हे सगळं धडाधड टाईप झालं.

रडू आल्यावर डोळ्यातून पाणीच आलं पाहिजे असं काही नाही. कधीकधी मनातून शब्दही येतात.