26.8.12

सन्नाटा....

'इतना सन्नाटा क्यु है भाई?' हा काही 'आज खुष तो बहोत होंगे तुम' सारखा पल्लेदार संवाद नाही. 'मेरे पास मा है' सारखा सुपरपॉवरफुल पंचही त्यात नाही. 'आय़ हेट टिअर्स' सारखा तो एका सुपरस्टारच्या तोंडून येत नाही, किंवा 'कितने आदमी थे?' सारखा तो सुपरव्हिलनच्या तोंडूनही येत नाही. तरीही या सर्व संवांदांईतकंच महत्त्व चित्रसृष्टीच्या ईतीहासात 'इतना सन्नाटा क्यु है भाई?' ला देखील प्राप्त झालं आहे. हा संवाद लिहणा-या सलीम-जावेद या जोडीइतकं, आणि त्याची कल्पकतेनं रचना करणा-या रमेश सिप्पींच्या दिग्दर्शनाईतशकंच; किंबहुना या सगळ्यांहून जास्तच कसब या संवादाच्या वेळी मानावं लागेल ते रहिम चाचा रंगवणा-या ए के हंगल यांचं!! सन्नाटा क्यु है विचारणारे रहिम चाचा आता आपल्यात नाहीत. आपल्यासाठी ते सोडून गेलेत फक्त... सन्नाटा!

ए के हंगल पंचाण्ण्यव वर्षांचे होते. अनेक महिन्यांपासुन ते आजारी होते. त्यांच्यापेक्षा उण्यापु-या पाच वर्षांनी मोठ्या असलेल्या भारतीय चित्रसृष्टीशी त्यांचं नातं मात्र कायम होतं. अगदी हल्लीच, म्हणजे दोन वर्षांपुर्वी त्यांनी रिलायन्सच्या 'क्रिष्णा और कंस' या ऍनिमेशनपटात महाराज उग्रसेनासाठी रेकॉर्डिंग केलं होतं. हा सिनेमा या जन्माष्टमीच्या मुहुर्तावर प्रदर्शित करतांना "ए के हंगल यांनीही मोठ्या उत्साहाने आमच्यासाठी रेकॉर्डींग केलं," हे बिग ऍनिमेशन्सच्या आशिष कुलकर्णींनी किती म्हणुन अभिमानाने सांगीतलं होतं! 'मेकिंग ऑफ क्रिष्णा' मध्ये ए के हंगल यांचा स्पेशल बाईटही घेतलेला होता. ऍनिमेशनपटासाठी रेकॉर्डींग करणं ही कल्पनाच पुर्णतः नवीन  असल्यामुळे आपण याला नवे आव्हान म्हणुन स्विकारल्याचं तेव्हा हंगल यांनी सांगींल्याचं लक्षात आहे. वयाची शंभरी गाठत असतांना नव्या कल्पनांचा आव्हान म्हणुन स्विकार करणा-या या 'ओल्ड मॅन' ला कोण बरं ओल्ड म्हणेल?

पण हंगल यांना 'ओल्ड मॅन' हेच बिरूद कायमचं जोडल्या गेलेलं होतं. सिनेमा समजायला लागला तेव्हापासुन त्यांना म्हाता-याच्याच भुमिकेत पाहिल्याचं आठवतं. टिव्हिवरच्या कुठल्याश्या कार्यक्रमात 'अनेकांना चिरतारूण्याचं वरदान लाभतं तसं हंगल यांना चिरवार्धक्याचं वरदान लाभलंय' असली काहीतरी टिप्पणी ऐकलेली  आज आठवतेय. वार्धक्य हे वरदान म्हणावं की नाही, हा प्रश्नच आहे, पण हंगल यांनी मात्र त्याचा उपयोग वरदानासारखाच केला, हे सांगणे न लगे.
बावर्ची मधला त्यांनी रंगवलेला मोठा काका असो, किंवा 'ओ हो हो दिपिकाजी आईये आईये' म्हणणारा त्यांचा हसमुख दुकानदार असो, 'नरम गरम' मधला त्रस्त झालेला कुशी चा बाप असो किंवा अगदी लगान मधला त्यांचा 'पानी तो बरसाओ' म्हणुन आकाशाकडे टक लावून पहाणारा गावातला सर्वात वयोवृद्ध म्हातारा असो; यात त्या त्या व्यक्तीरेखेबरोबरच तितक्याच प्रभाविपणे लक्षात राहतो तो ए के हंगल नावाचा कलाकार! 
हंगल यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं तेच मुळी त्यांच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी. त्यामुळे चरित्र भुमिका हेच त्यांचे क्षेत्र राहणार हे नक्कीच होतं. चित्रपटसृष्टीत येण्याआधी आणि त्यानंतरही हंगल कम्युनिस्ट पक्षाचे खंदे कार्यकर्ते होते आणि राहिले. त्यांच्या जुन्या आणि पक्क्या साम्यवादी विचारांच्या पायाचा वापर त्यांनी रंगमंच आणि नंतर चित्रपटसृष्टीमध्येही एक आदर्शवादी आणि सामान्य भारतीय मध्यमवर्गीय व्यक्तीरेखा उभ्या करतांना खुप चांगल्या पद्धतीने करून घेतला. आर के लक्ष्मण यांचा 'कॉमन मॅन' हंगल यांच्यासारखा दिसत नसेलही कदाचित; पण ईंडियन कॉमन मॅन म्हटलं की हंगल यांनी रंगवलेल्या व्यक्तिरेखाच समोर येतात.

समाजकारण, रंगमंच, चित्रपटक्षेत्रातली चार दशके, टिव्हीवर गाजवलेला एक काळ, आणि नुकतीच बदलत्या काळातल्या डेली सोपमध्ये 'मधुबाला' च्या माध्यमातुन घेतलेली एक छोटीशी एन्ट्री -- ए के हंगल या एका व्यक्तीने पंचाण्णव वर्षाच्या आयुष्यात केलेलं मल्टीटास्कींग थक्क करणारं आहे. हे सगळं करतांना आपला व्यासंग, विचार आणि 'सन्नाटा' यांच्याशी असलेलं आपलं नातं त्यांनी नेहमी जपलं. त्यांचं काम सुरू  राहिलं ते त्यांनी केलेल्या भुमीकांप्रमाणेच साध्या आणि सरळ पद्धतीने. चित्रसृष्टीने त्यांची हवी तशी दखल घेतली, न घेतली हा विषय हंगल यांच्या उतारवयात त्यांच्यासाठी फार अलाहिदा होता. स्टॅंड-अप कॉमेडी शोजचं भरमसाठ पीक येऊ लागलं तेव्हा हंगल साहेब आणि त्यांचा सन्नाटा हा विनोदाचा विषय झाला.
हंगल साहेबांनी याकडे लक्ष दिलंच नाही. नवं काहीतरी करण्याचा त्यांचा शोध सुरू राहिला.

या वर्षी चित्रपटसृष्टीला शंभर वर्ष पुर्ण झालीत की तीची शंभर वर्ष भरलीत हे कळायला मार्ग नाहीय. देव आनंद, राजेश खन्ना, दारा सिंग, आणि आता ए के हंगल. शंभरावं वर्ष आणखी काय काय दैवदुर्वीलास दाखवणार आहे ते आता बघायचे. मात्र 'शो मस्ट गो ऑन' चा मुलमंत्र चित्रपटजगताने जपलाय. जपत राहणार आहे. हा मंत्र हरपत असल्याची जाणीव जरी त्यांना झाली, तरी हंगल साहेब सगळ्यांना जागं करत विचारतील - ईतना सन्नाटा क्यु है भाई?

21.8.12

जीव जडल्यावर मन मोडतांना


जीव जडल्यावर मन मोडतांना होणा-या वेदना कश्या असतात याचा अनुभव घेत नागपूर सोडलं तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. केरला एक्सप्रेसच्या खिडकीच्या बाहेरून हात हलवणारे बाबा त्यांच्या चेह-यावरची काळजी आणि लेकरू दूर जाण्याचं दुःख लपवू शकत नव्हते. पत्रकारांसाठी खुप महत्त्वाच्या आणि मानाच्या असलेल्या या शिबिरासाठी जाणा-या मला हात हलवून शुभेच्छा देणा-या मित्राच्या मनात अभिमान, आनंद आणि हूरहूर सगळं एकत्र दाटून आलेलं. वर्षभर ज्या क्षणासाठी अनेक प्रयत्न केले  तो क्षण प्रत्यक्षात येत असल्याचा आनंद आणि येत्या महिन्याभरात अनुभवांच्या खजीन्यात होणार असलेल्या दशलक्षावधी टनांच्या वृद्धीबद्दल वाटणारं सुख या सर्वांनी मी तर हूरळून जायला हवं  होतं. पण माझी अवस्था पुर्णतः वेगळीच झाली. प्रत्यक्ष रडायला येत नव्हतं, पण आसु थांबत नाहीयेत असं वाटत होतं. तयारी निट सुरू होती. सामान निट पॅक करणे, सुटकेससाठी कुलुप  घेणे, ट्रेनमध्येही सग़ळं सामान निट ठेवणे, सगळं काही यंत्रवत सुरू होतं. शरीर काम करतंय आणि मन कुठेतरी कोप-यात बसुन रडतंय अशी अवस्था झालेली. पुन्हापुन्हा तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता.

"मी रडणार नाही. नाहीतर माझा रडका चेहराच तुझ्या लक्षात राहिल. एक महिन्यापेक्षा जास्त दिवस काढायचे आहेत ना आपल्याला!," तीचं स्वतःला समजावणं आणि मला धिर देणं सुरू होतं.
दोघांनाही वाटत होतं की एकमेकांपुढे रडायचं नाही आणि दोघांनाही माहिती होतं की एकट्यात दोघेही खुप रडणार आहोत. आणि का नाही येणार रडू? आता काल-परवा तर सगळं सुरळीत होउ लागलेलं होतं. ईथे काल-परवा म्हणजे अगदी शब्दशः काल परवा!

सोळा तारखेला लग्न ठरलं आणि अठरा तारखेपासुन महिन्याभराचा विरह. या आधी आलेले चढ उतार, रागलोभ, रुसवे फुगवे दोघांनी मिळून एकमेकांना धिर देत निभावून नेलेले. कुठल्याही परिस्थीतीत एकमेकांना साथ द्यायची हे ठरवून अगदी तसंच वागलेलो. आताशा कुठे सगळं निट झालं. सेलिब्रेट करायला हवा होता हा आनंद पण तसा वेळच झाला नाही. सगळं सेलिब्रेशन गेलं एक महिन्यावर! मग एका स्वप्नासाठी दुस-या स्वप्नाला लांबणीवर टाकत निघालो, गाडीने नागपूर स्टेशन अलगद मागे टाकलं, तसं.

पहाटे पाच नंतर झोप लागली आणि सकाळी आठ वाजता जाग. एव्हाना आंध्रप्रदेशात आलो होतो. म्हणजे तेलंगणात. खुपसा विदर्भासारखाच आहे हा भाग  असं विक्रम रेड्डीने सांगीतल्याचं स्मरणात होतं. ते खरं आहे. झाडाच्या, मातिच्या रंगापासुन ते अंगाला लागणा-या वा-यापर्यंत सगळं आपलंसं वाटावं असं आहे ईथे. धानाची शेती, हिरवळ आणि शेततळी. डोळ्यात भरावं ईतकं वैभव आंध्राच्या शेतीमध्ये आहे. तरीही ईथला शेतकरी विदर्भाच्याच शेतक-यासारखा दुःखी आहे. ईथेही वेगळ्या राज्यासाठी कित्येक वर्षापासुन आंदोलनं सुरू आहेत. ईथेही एका भागाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्या भागावर अन्याय केला आहे. आपल्याकडे नाईक, पाटिल आहेत, आणि ईकडे रेड्डी! आपल्याकडेही सामान्यांना चेहरा नाही, आणि ईकडेही. शेवटी भारतातच आहोत आपण, दुस-या देशात नाही ही खात्री ईथे येउन पटली.

तिरूपतीला गाडी थांबली तेव्हा खाली उतरून या पावन नगरालाच वंदन करून आलो. बालाजीचा डोंगर दुरून दिसतो. व्यंक़टेश्वराचे तेवढेही दर्शन पुरेसे. लहान असतांना रांगेत उभे राहून दिवसभराच्या प्रतिक्षेनंतर व्यंकटेशाचे सोन्याने मढलेले रूप चारेक सेकंदांपर्यंत पाहिल्याच आठवते. तिरूपती म्हटलं की सामान्यांच्या दृष्टीने जवळचा असा श्रीमंतीचा विषय तर निघालाच पाहिजे. तसा तो गाडीत बसल्यावर चर्चेला आला. हल्ली लोकांकडे काळा पैसा खुप झालेला आहे, म्हणुन आपले पाप देवाने पचवावे या उद्देशाने लोक पैसा दान करतात. भ्रष्ट मार्गाने पैसे मिळवणा-यांना येणारा गिल्टी फिल, किंवा असुरक्षिततेची भावना कोट्यावधीचं दान करायला भाग पडते वगैरे चर्चा रंगल्या.

रात्री कधीतरी आयडिया मोबाईल्सचा एक मॅसॅज आला. कि वेलकम टू तामिल नाडू! झोपेतच तो मॅसॅज पाहिला आणि दुर्लक्ष केलं. पहाटेच्या सुमारास पुन्हा मोबाईल वाजला. मॅसॅज असणार. आणि तो ही कंपनीचाच. कारण सरकारने आता मॅसॅजॅस वर बंदी आणलेली आहे. त्यामुळे मित्रांचे, ऑफीसमधल्या कलिग्सचे, किंवा 'तीचे' मॅसॅजेस येणं दुरापास्तच. तरीही ती पाच मॅसॅजेस पाठवते. अगदी पूरवून पुरवून! कसली विचित्र परिक्षा आहे ना ही? एकाच गावात असतांनादेखील दिवसभरात शे-दिडशे मॅसॅजेस पाठवणारे आम्ही, आणि आता ईतके दूर असुन साधे पाच मॅसॅजही पाठवू शकत नाही!

अंदाजाप्रमाणे मॅसॅज कंपनीचाच होता. केरळ आल्याचं सांगणारा संदेश. पण मॅसॅज वाचण्याच्या आधीच बाहेर दिसणारी नारळाची झाडं आणि अगदी नव्याको-या छायाचित्रात चमकून दिसेल अशी हिरवळ पाहूनच आपण केरळमध्ये आल्याचं कळलं. सोनेरी ऊन म्हणजे काय ह्याचा सगळ्यात सोनेरी प्रत्यय यावा असं ठीक़ाण म्हणजे केरळ! गॉडस ओन कंट्री -- म्हणजे प्रत्यक्ष देवाचंच स्वामित्त्व असणारा प्रदेश असं त्याला म्हट्लंय ते उगाच नाही. अगदी निसर्गचित्रांमध्ये लहान मुलांनी काढावे तसे रस्ते, वनराई, नदी, नाले, आणि शेती प्रत्यक्षात पहायला मिळते ती या प्रदेशात. घराचा मागचा दरवाजा अगदी तलावातच उघडतो, हे बघतांना आश्चर्यही वाटतं आणि थोडं विचित्रही. केरळमधल्या शेतातही मोठमोठी शेततळी आहेत. ईथल्या शेतातल्या झोपड्या, किंवा कौलारू घरं खुप नवीकोरी वाटतात. कदाचित नुकत्याच आलेल्या पावसात धुवून निघाली असतील म्हणुन असेल. सगळंकाही नवं दिसतं, चकाकणारं. ट्रेनच्या अगदी समांतर जाणारा रस्ता, कौलारू घरांच्या अगदीच जवळून जाणारी रेल्वेगाडी, आणि फाटक नसतांनाही रेल्वेगाडीसाठी शिस्तीत थांबलेले लोक; अशी  अनेक दृष्य़ं या प्रवासात डोळ्याने हेरली.

दहाच्या सुमारास एर्नाकुलम स्टेशनवर गाडी थांबली आणि रेल्वे स्टेशन सगळीकडचे सारखेच, असा अनुभव घेत पुढं निघालो.  स्टेशनच्या मुख्य़ द्वारावरच स्वागतासाठी उभे होते भारतीय जलसेनेचे जवान. पांढ-याशुभ्र पोषाखात पांढ-याच गाड्या घेऊन उभे असलेले नेव्हीचे जवान आम्हाला घेऊन आमच्या मुक्कामी  म्हणजे हॉटेल ट्रीडेन्ट् येथे आम्हाला घेऊन आले. सगळ्यांशी अनौपचारिक  ओळख झाली. ज्या खोलीत येता आठवडाभर रहायचे आहे ती खोली, ते हॉटेल पाहून झाले. केरळचे निसर्गसौंदर्य भरभरून दिसावे याची पुर्ण काळजी येथे हॉटेलच्या ईंटेरिअर डेकोरेटर आणि आर्कीटेक्टने घेतलेली आहे. आज संध्याकाळी हॉटेलच्या कॉन्फरन्स रूममध्येच सर्व सहका-यांची आणि कोर्सच्या मुख्य कार्यवाहांची औपचारिक ओळख होइल. त्यानंतर उद्यापासुन ख-या अर्थाने कोर्सची सुरूवात.