1.10.14

त्रस्त!


आज यवतमाळला होतो. इथे खूप डास आहेत. लाईन पण जाते. संध्याकाळी घरात डासांनी त्रस्त करू नये म्हणून पोराला घेऊन बाहेर निघालो. इथे घरापुढे अंगण आहे. वर गच्चीही आहे. त्याला गच्चीवर घेऊन गेलो. आता तो सहा महिन्यांच्या होत आला आहे. जन्मापासूनच भरपूर असलेले त्याचे केस आता चांगलेच लांब वाढलेत. अजून जावळे काढण्याचा कार्यक्रम व्हायचाय ना! संध्याकाळच्या हवेने त्याचे केस भुरूभुरू उडत होते. गच्चीवरून तो आजूबाजूला बघत होता ना... तेव्हा!

त्याला कडेवर घेऊन फिरवायला लागलो. पाचेक मिनिटांनी एक पक्ष्यांचा थवा उडत उडत आला. पश्चिमेकडून पूर्वेकडे.... सहज म्हणून त्याला दाखवलं! “ते बघ! चिऊ...” अजून पुरता सहा महिन्यांचा देखील नाही, त्याला कसलं काही कळणार? पण दाखवलं! पठ्ठ्याने पाहिलं देखील! तेही अगदी मन लावून! त्याला उडणारे पक्षी दिसले. आणि त्यानंतर आलेला प्रत्येक थवा त्याने तितक्याच उत्साहाने पाहिला. अगदी पूर्वेकडच्या आकाशात गडप होत नाही तोपर्यंत!

जरा अंधारून यायला लागलं तर खाली गेलो. गाईच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज आला. तो भिरभिर पहायला लागला “अरे बघ बघ! हम्बा!” त्याला जवळ नेऊन गाय दाखवली. मावळत्या दिवसाबरोबर घरी जाता जाता मैदानावर उगवलेल्या गवताने मुखशुद्धी करणाऱ्या गाई त्याने पाहिल्या. त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज येणे बंद होईपर्यंत तो त्यांचा वेध घेत होता. संध्याकाळी मैदानावर पळत पळत आलेली काही कुत्री त्याला दाखवली. “बघ आकु!” तो डोळे विस्फारून पहायला लागला. कुत्री जिकडे पळतील तिकडे त्याची नजर त्यांच्या हालचालींचा वेध घेत राहिली. एव्हाना अंधारून आलं. घरी परत निघालो. रस्त्यावरून जाणाऱ्या बाइक्स, कार्स, आणि ऑटोचे हेड-लाईट्स आता त्याला आकर्षित करू लागले. बाजूच्या जयस्वालकडची मंडळी त्यांच्या नव्या एसेंट मध्ये बसून जवळच्या त्यांच्या शेतावर निघाली होती. कार थांबवून त्यांनी बाळाला टा टा केला. खुशीत घरी परतलो. समोरच्या अंगणातल्या पाळण्यावर जाऊन बसलो. झोका घेतला तरी डास चवतच होते. “बाप रे! नागपूरला डास नाहीत हे बर आहे!,” सहज मनात विचार आला..

हो! नागपूरला डास नाहीत. पण नागपूरला अंगणही नाहीय. नागपूरला पक्षांचा थवा दिसत नाही. नागपूरला हम्बापण नाही. आकु पण नाही. असलेच तर पाप्पीस किंवा डॉगीस आहेत. नागपूरला गच्चीपण नाही. टेरेस आहे, पण त्यावर बाळाचे केस कधी हवेच्या झुल्यावर भुरभूर उडालेले पाहिले नाहीत.
तरीपण नागपूर नागपूर आहे. शहर आहे! किती सुविधा आहेत! मेट्रो सिटी! बाजुच्याकडे आहे तशी एसेंट तिथे शेकडो लोकांच्या जवळ आहे.

पण ती रस्त्यावर थांबवून बाळाला टा टा कुणी करत नाही.

एक लक्षात आलं. नागपूरला आहेत त्या गाड्या यवतमाळला आल्यात. तसे रस्तेही झालेत. पण लोक अजून तसेच आहेत. इथली चिऊ, हम्बा, आकु अजूनही जिवंत आहेत. इथल्या घरावरची गच्ची आणि संध्याकाळची हवा अजूनही शाबूत आहे. यंदा पाउस कमी झाला, तरी मैदानावर अजूनही गाय चरू शकेल इतकी हिरवळ आहे. घराचं अंगण हिरवं आहे, त्यातला पाळणा अजूनही झुलतोय.

मनात आलेलं हे सगळ मी इथे कम्प्युटर वर झटपट टाईप करू शकतोय. ब्लोग वर टाकायला इंटरनेट आहे. तरीही यवतमाळ छोटंसं गाव आहे. इथे क्वालिटी ऑफ लाईफ कमी आहे. म्हणून मी उद्या सकाळी नागपूरला परत जातोय. नोकरीवर जॉईन व्हायला.