30.8.10

पावसानं ईचीन...

या वर्षी पावसाला काय झालं आहे कळत नाही. तुफान बरसतो आहे. या पावसाला कुणाची नजर लागायला नको. सहज म्हणून पाऊस पहायला निघालो होतो, तेव्हा रिपरिप सुरू होती. पण आपल्याला पहायला क़ुणीतरी आलंय या आनंदानं जणू काही पावसाला भरतंच आलं आज. दे धमाल बरसला पाऊस. जवळपास तासभर. लोकांना गरमी होतेय म्हणून एखादी सर बरसवणारा आणि निघून जाणारा हा उसन्या अवसानाचा पाऊस नव्हता. एखाद्या नृत्यांनगनेची नृत्य करता करता समाधी लागावी, आणि स्वतःच्या समाधानासाठी तीच्या पावलांनी थीरकण्याचं थांबूच नये.. असा आज पाऊस बरसतच राहिला. रस्ते तुडुंभ भरले, वाहनं थांबुन गेली, पायी चालणार्र्यांनी तर सपशेल शरणागती पत्करली पावसापुढे. आडोसा घेऊन उभे असलेल्यांची आज पावसाने कदर केली नाही. छत्री- रेनकोट घालून पावसाला टाळू पहाणार्र्यांची त्याने तमाच बाळगली नाही. रेनकोट छत्री, आणि कपडे, सगळी आवरणं भेदत पाऊस थेट हृदयाला जाऊन भिडला.

पाउस हृदयाला भिडला. आणि आज जवळपास चार पाच वर्षांनी "पावसानं ईचीन कहरच केला.. अन लोक म्हने नागोबुढा वाहूनच गेला.." या ओळी आपोआपच आठवल्या. व्हराडी कवीतांचा 'राजा माणूस' शंकर बढेंची ही कवीता. या कवीतेने बाबा बढेंना व्हराडी कवीतेच्या क्षेत्रात नाव मिळवून दिलं. मी चार वर्षांचा असेल तेव्हा. असेच पावसाळ्याचे दिवस होते आणि कसलातरी सांस्कृतीक कार्यक्रम होता. सकाळपासून मामा लोकांनी माझ्याकडून 'पावसानं ईचीन कहरच केला' ही कवीता म्हणवून घ्यायचा चंगच बांधला होता बहुतेक. नवंनवंच वाचायला शिकलो होतो. समोर शंकर बडेंचा कवीता संग्रह होता. संग्रह कसला! अगदीच साधारणश्या पुस्तीकेसारखा दिसणारा काही कागदांचा सेट. हल्लीच्या हार्डबाऊंड-ग्लॉसी कव्हरपेज-आकर्षक फॉन्ट-आणि ईल्युस्ट्रेशन्स वगैरे असणार्र्या कवीतासंग्रहांसारखा तो मुळीच नव्हता. खिळे लावून बनवलेल्या प्रिंटींग मशिनवरच्या एकाच फॉण्टने सुटसुटीत लिहलेल्या अक्षरांचा संच. 'पावसानं ईचीन..' ही कवीता मी सकाळपासूनच वाचत होतो. 'बुढीसंग त्याचं भांडन झालं ज्यमुन, न रागंरागं पोरीकडं गेला तो निंगुन' या ओळी असो, किंवा नागोबुढा खरंच वाहून गेला, असं म्हटल्यावर 'बुढी त बापा, गया काढुन लडे, न दाट्ट्यात ईचीबहीन उठुउठु पडे' ही ओळ असो, श्याम मामाने अगदी व्हराडी लेहज्यात माझ्याकडून ती म्हणवून घेतली होती. मध्येच आई, अतुल मामा, आणि बाबाही 'दुरूनच दिशे त्याचा रंगीत शेला..' या ओळीतला ला... कसा वाढवायचा, याचं ट्रेनिंग देत होते. संध्याकाळी समजलं, की वर्र्हाडी कवी संमेलनात शंकर बडेंच्या उपस्थीतीतच मला ही कवीता म्हणायची आहे. जवळपास सगळी कवीता पाठ झाली होती. फक्त प्रत्येक कडव्याच्या सुरवातीला एक स्टार्ट लागत होता. त्यासाठी मग मी पुस्तक सोबत ठेवायचं ठरवलं. तश्या पद्धतीने दोन चार वेळला रंगीत तालीमही केली. आणि "तो पोरीच्या गावाले जाऊन बी आला न तुपासंग पोळी खाऊन बी आला, न तरी म्हने एक रस राहूनच गेला... न लोक म्हने नागबुढा वाहूनच गेला.." या ओळीसह सगळी कवीता जमायला लागली. वेळेवर झालं मात्र भलतंच.

कवी संमेलनाला वेळेवर पोचलो, आणि नेमकं सगळेच जण पुस्तक बरोबर घ्यायचं विसरले. सवय पुस्तकातून पहिली ओळ पाहून म्हणण्याची झाली होती. म्हणजे आता जमण्यासारखं काही नव्हतं. दुसरं पुस्तकही तीथे नव्हतं. स्वतः शंकर बडे कवीतांचं पुस्तक बरोबर घेऊन कवीसंमेलनाला येत नाहीत. आपल्या कवीता त्यांना पाठ असतात. त्यामुळे आता माझं कवीता वाचन रद्द होते की काय असं वाटायला लागलं. आईने मला धोतर, टोपी, जॅकॅट वगैरे टीपिकल व्हराडी पोषाख करवून आणलं होतं. वेळेवर पचका होतोय हे पाहून मला थोडं विचित्र वाटत होतं, पण नक्की काय वाटत होतं ते मात्र आठवत नाही. मग अचानक शाम मामा आला. म्हणाला "लाल्या स्टेजवर जा अन माईकपुढे बस." म्हटलं जेवढं येइल तेवढं म्हणू. जाऊन बसलो. सुरवात केली ... 'पावसानं ईचीन कहरच केला, न लोक म्हने नागोबुढा वाहूनच गेला...' टाळ्या वाजल्या. पुढे काय? क्षणार्धात कानात एक हळूवार आवाज आला. "बुढीसंग त्याचं.." मला हा स्टार्टच हवा होता. सुरू झालो. मग प्रत्येक कडव्याला सुरवातीला मला असा स्टार्ट मिळत गेला, आणि कवीता झक्कास झाली. त्यानंतर कौतुकाने मला स्टेजवरून आपल्या खांद्यावर उचलून आणणारा, आणि कवीते दरम्यान मला स्टार्ट देणारा, माझ्या बाजूला बसलेला व्यक्ती म्हणजे स्वतः शंकर बडे च आहे, हे माझ्या नंतर लक्षात आलं.

बाबा बढेंची 'पावसानं ईचीन कहरच केला' ही कवीता मग प्रत्येक पावसाळ्यात माझा सुपरहिट आयटम ठरू लागली. तेव्हा पाऊस खरोखरच कहर करत असे. गेल्या तीन चार वर्षात मात्र ही कवीता आपोआप स्फुरलीच नाही कधी. पाउस तसा कहर करतच नव्हता, असं नाही. बरेचदा करायचाही. पण जेव्हा नको असेल, तेव्हा. नेमकी पेरणी झाली की पाऊस कहर करायचा आणि छोटीचोटी रोपं मरून जायची. दुसर्र्या पेरणीचं पीक कापणीवर आलं की मग पाऊस कहर करायचा, आणि मग कास्तकारांची पुरती वाट लागायची. हे सत्र गेल्या पाच सहा वर्षापासून सुरू होतं. पाऊस बरसतच नसे. आणि बरसलाच तर अवेळी. त्यामुळे फक्त पावसावर पोट असलेले कास्तकार हतबल झाले. हजारोंनी आत्महत्या केल्या. 'पावसानं ईचीन..' हे शब्द या कोरड्या वादळात कुठेतरी गडप झाले होते. पण आज ते आठवले. पावसाचा या बेभान नृत्याविष्कारानंतर "पाह्यटीस बुढा गावातच दिशे, न लोकायकडं पाहून खुदुखुदु हशे" या ओळीप्रमाणे यंदातरी कास्तकारानं खुदुखुदु हासावं असं वाटून गेलं.

बाकी वरच्यावर डिपेंड हाय!