9.9.09

मोबाईल

अचानक मोबाईल खराब झाला. काही बटणं पुरती कामातूनच गेली. एसएमएस पण टाईप करता येइनासा झालाय आणि कुणाला फोन लावावा म्हटलं, तर तेही मोठं कठीण होउन बसलंय. कुणाचा फोन आला, तर तो उचलायचा की नाही, हे ही आता मोबाईलच ठरवतोय. कारण रिसिव्ह चं बटण कधी काम करेल, आणि कधी नाही, हे त्याचं त्यालाच ठाऊक आहे. गैरसोय होत आहे. पण हा देखील एक नवा अनुभव. वस्तू आहे. कधी ना कधी खराब व्हायचीच. दूसरीही येइल. पण या मोबाईलच्या खराब होण्याच्या निमित्ताने आठवणींच्या एसएमएस नी मनाचा ईनबॉक्स फूल करून टाकला, त्याचं काय?
मिळाला तेव्हा खूप क्रेझ होती मोबाईलची. जेव्हा भाउबिजेला अनिल मामाने आईला ओवाळणीत मोबाईल दिला, तेव्हा मलाच धन्य झाल्यागत वाटलं होतं. तासनतास 'स्नेक' खेळत बसायचो, या गोष्टीचं आज आश्चर्य वाटतं, पण हाईयस्ट स्कोरमध्ये साडेचारहजाराचा आकडा पाहिला, की परत विश्वास बसतो. वेड होतं. आपण वेडे होतो का तेव्हा?! नाही. पण ते दिवसच बेटे तसे होते. कुणाचा तरी फोन यावा आणि मोबाईलची रिंगटोन वाजावी म्हणून कान टवकारूनच बसलेलो असायचो. फोन यायचाच नाही सहसा. आला तर एखादा, तोही मोबाईल कंपनीवाल्यांचा फोन. त्याचंच भारी अप्रूप होतं. कुण्या नातेवाईकाचा फोन एखाद्यावेळी आलाच, तर खूप नवल वाटायचं. मित्र तर फोन करतच नव्हते. मिसकॉलचीच भाषा प्रचलीत होती. कारण पैसेच नसायचे तीतके खीशात.
पैसे नाहीत म्हटल्यावर मैत्रीणी कश्या असणार? मग त्यांचेही एसएमएस किंवा कॉल्सही नव्हते. मोबाईल मुकाच पडलेला असायचा. अरेच्या, चुकलो. मोबाईल मुका असायचा,पण पडलेला नसायचा. जवळच असायचा नेहमी. वाटायचं की कुणाचातरी फोन येइल. कधीकधीच ही ईच्छा पुर्ण व्हायची. त्यातही कधी एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आला, तर खूपच अप्रुप! सलग दोनचारवेळा त्याच नंबरवरून मिसकॉल आला, तरी एक कहाणी बनायला पुरेसं होतं. रॉंग नंबर आलाच कधीमधी, आणि समोर मुलीचा आवाज असला, तर ही गोष्ट कॅन्टीनमध्ये एक-एक चहा आणि ब्रेडपकोडा खीलवण्यासाठी पुरेशी असायची.

ऐनवेळेवर नाटकाच्या प्रॅक्टीसची बदलेलेली वेळ सगळ्यांना मी याच मोबाईलवरूनच कळवायचो. राज्यनाट्यस्पर्धेत प्रशस्तीपत्र मिळाल्याबद्दल अभिनंदनाचे फोनही यानेच रिसिव्ह केलेत. सकाळच्या एकांकीका स्पर्धेत मी बसवलेलं नाटक अव्वल आल्याचा फोनही वैभव टप्पेने याच मोबाईलवर केलेला होता. याच मोबाईलवर फायनल ईयरचा निकाल नेटवर आल्याची खबर मी सगळ्या मित्रांना दिली. याच मोबाईलवर 'ईस धीस चैतन्य? आय ऍम आलोक तीवारी फ्रॉम हितवाद. यू आर सिलेक्टेड फॉर द जॉब." म्हणून फोनही मी रिसीव्ह केला. गाव सोडून जातांना "मोबाईलमध्ये पैसे आहे नं रे? बोलावसं वाटलं तर फोन करशील," असं म्हणून आपल्या डोळ्यातलं पाणी लपवणारी आई -- "आता मोबाईल आहे नं त्याच्याजवळ, कधीही वाटलं, तर लावायचा फोन!" असं म्हणणारे बाबा -- आणि "दादाचा मोबाईल नंबर - ९९२२३२९९७६" असं आपल्या गोलगोल अक्षरात फोनजवळच्या भिंतीवर लिहून ठेवणारी लहान बहीण. या मोबाईलचीच देण नव्हती का?
ज्याच्यामुळे हा मोबाईल मिळाला, तो अनिलमामा खूप सिरिअस असल्याची बातमीही याच फोनवरती ऐकली. अनिलमामा अवेळी निघुन गेल्याची बोहारी बातमीही याच फोनने दिली. त्याची आठवण म्हणून हा फोन खूप दिवस वापरायचा, कधीच नाही सोडायचा, हे तेव्हा ठरवलं होतं. कदाचीत खूप दिवस झालेत आता. खूप दिवस.