18.7.13

नंदी


ईतकं डौलदार जनावर मी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. 'महादेवाचा नंदी' म्हणुन अगदी चपखल शोभुन दिसेल असा तो बैल आमच्या घरापुढे येऊन उभा राहिला तेव्हा आश्वर्य, आनंद, उत्सुकता या सगळ्या भावनांनी मनात गर्दी केली. 'बुगुबुगु' वाजणं हे नक्की काय असतं हे ब-याच दिवसांनी कानांना ऐकायला मिळालं. नागपूरात कधी नंदिबैल येइल आणि तोही अगदी 'टिपीकल' पंढरपूर/कोल्हापूर कडच्या लोकांनी आणलेला असेल, असं स्वप्नातही वाटलं नाही. त्यांच्या खास पश्चीम महाराष्ट्रीय लेहज्यामध्ये खड्या आवाजात नंदिला प्रश्न विचारत त्या दोन तरूणांनी सुरवात केली. "पंढरपूरवरून आलायस का?", "नागपूरला राहशील का?", "रामटेकला जाणार का?" अगदी जुजबी प्रश्नांवर नंदिबैलाची मान 'होय होय' किंवा 'नाही नाही' मध्ये डोलायला लागली. एरवी स्मशानशांतता (ज्याला की हल्ली पिसफुल सोशल ऍटमॉस्फिअर म्हणतात) असलेल्या आमच्या सोसायटीमध्ये अचानक आवाज वाढलेला पाहून अनेकांच्या झोपा मोडल्या. काही लोक उत्सुकतेपोटी बाहेर आले. काही घराच्याच खिडक्या दारांमधून डोकावायला लागले. मात्र वाटलं होतं तसं काहीच झालं नाही.

गावात नंदि आला असता तर आजुबाजुची सगळी बच्चेकंपनी घराच्या बाहेर येऊन गोंधळ घालण्यात मग्न झाली असती. म्हातारी माणसं अंगणात, रस्त्यावर येऊन नंदिबैल आणि त्याच्या आजुबाजुला बागडणा-या नातवंडांचं कौतुक करत उभी असती. आई-बहिणींनी घरात पसा पसाभर गहू, दाळ नंदिबैलवाल्याला द्यायला आणण्यासाठी तयारी सुरू केली असती. आणखीही  खुप काही. मात्र ईथे त्याचं निटस असं स्वागतच झालं नाही. मरतुकड्यासारखे लोक आपल्या खोपट्यातून बाहेर यायलादेखील धजावत नव्हते.

नंदिबैलवाला मला आपल्या संस्कृतीचं, लोप पावत चाललेल्या परंपरांचं जतन करणारा पाईक वाटला. त्याला निदान दहा-वीस रुपये तरी द्यायचे असं ठरवून मी बाहेर निघालो. "हा पैसे खात नाही. गहू खातो. गव्हाचे पिठ खातो. तांदूळ, डाळ खातो..." नंदिवाल्याचे सुरू झाले. "काय रे पैसे खाशील का?"... बैलाने 'नाही नाही' अशी मान हलवली. "कागद खाशील?", "लाकुड खाशील?" या सर्व प्रश्नांवर त्याचे 'नाही नाही' सुरू राहिले. अचानक 'गहू खाशील?' विचारल्याबरोबर 'होय होय' अशी मान हलवून नंदिबैलाने अगदी एका क्षणात आपल्या बुद्धीमत्तेने ईम्प्रेस केले. एका वाट्यात तांदूळ आणि गुळाचा खडा घेऊन खाली आलो. "आपल्या हाताने खाऊ घाला. तो काहीच करत नाही," - नंदिबैलवाल्याने असं सांगीतल्यावरही हिम्मत झाली नाही. शेवटी त्याच्याच बरोबरच्या एका माणसाने आपल्या हाताने त्याला तांदूळ खाऊ घातले. नंदिबैलवाल्याने मग माझ्याबद्दल सांगायला सुरूवात केली. अर्थात ते महत्त्वाचं नाही. कारण ती त्यांची एक ट्रीक  असते. बाजुचा माणूस आपल्याला माहिती विचारतो. आणि ती कान देऊन  ऐकत दूसरा माणूस ती जाहीर करतो. "तुम्ही पत्रकार आहात! आत्ताच लग्न झाले आहे! सगळं छान होणार आहे!" ईत्यादी सांगत त्याने दोन चार भविष्याचेही फंडे दिले. पण माझ्या दृष्टीने त्याला काही अर्थ नाही.

अर्थ होता तो नंदिबैलाला घेऊन येणा-या नंदिवाल्यामध्ये. आम्हाला निदान अधूनमधून तरी दिसलेले हे आपल्या परंपरांचे पाईक कदाचीत यानंतरच्या पिढीला कधीच दिसणार नाहीत. ह्या परंपरा अजुनही जपणा-या या नंदिवाल्याला पैसे नको होते. खरोखरच नको होते. नागपूर ते रामटेकच्या वाटेवर जात असतांना बैलाचा सकाळचा नास्ता व्हावा म्हणुन त्याने नंदिबैलाच्या खेळाचा घाट घातला असावा. पण लोकांना हे मंजूर नव्हते. नंदिवाल्याने पंधराएक मिनिट गप्पा केल्या असतील तेवढ्यात बाजुच्या घरातून बाहेर आलेल्या एका माणसाने ओरडायला सुरूवात केली... "न्युसन्स होतोय. जोरजोरात ओरडून सकाळ खराब करता काय? निघा ईथून" आणि बरंच काही.

नंदिवाल्याला कदाचीत असल्या अपमानाची सवय नसावी. त्याच्या पंढरपूर/सोलापूर कडे त्याला बिदागी किती मिळत असेल माहिती नाही, पण अशी वागणुक मिळाली नसेल. नागपूरचे लोक घरातही बोलत नसतील ईतकी शुद्ध भाषा बोलत असणा-या त्याला नागपूरी लोकांची 'सो कॉल्ड' खासियत असलेल्या शिवराळ भाषेचीही सवय नसावी. नंदिवाल्याने आदरपुर्वक क्षमा मागुन तिथून काढता पाय घेतला. एका शब्दाचेही दुरूत्तर न करता तो निघून गेला. तडक निघून गेला. त्याला हाकलणा-या माणसाने गड जिंकल्याच्या तो-यात घरात एन्ट्री केली.

उद्या संस्कृती संकटात आली आहे, हल्ली कुणी आपल्या परंपरांना विचारत नाही, आणि युवा पिढीची वाट लागली आहे ईत्यादी विषयांवर हेच लोक पुढे होवून चर्चा करतील. युवा पिढीची छि थू करतील. परंतू सकाळी साडेआठ वाजता  ए सी मध्ये झोपलेल्या आपल्या दहा वर्षाच्या मुलाला उठवून 'हे बघ  आपल्या घरासमोर नंदीबैल आलाय' म्हणून या एका परंपरेशी त्याचा परिचय करून देण्याचं भान मात्र ठेवणार नाहीत. नंदिबैल परत येईल किंवा येणार देखील नाही, पण शहरी होण्याच्या मागे लागून आपला ठेवा मुद्दामहून हरवू पाहणा-या या नतद्रष्टांना काय म्हणावे?