27.5.09

पाऊस

हल्ली संध्याकाळी आभाळ भरून येतं. पण पाऊस येत नाही. दूपारच्या तळपत्या उन्हानंतर संध्याकाळी जरावेळ थंड वारंही वाहतं. पण पाऊस मात्र येत नाही. अगदीच नाही असंही नाही, पण आला तरी दोन चार थेंब. त्यानंतर नाही. वारा ढगांना घेऊन जातो असं म्हणतात ना, तसे "बरसतो बरसतो..." असं म्हणत ढगांची स्वारी अलगद गडप होते. या शहराची म्हणे ही रीतच आहे.
गावात मात्र पाऊस असा यायचा नाही. उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी एखाद्या संध्याकाळी ढगांची दाटी व्हायची आणि अवघ्या काही क्षणांत जणू आभाळ फाटल्यासारखा मुसळधार बरसायला लागायचा पाऊस. बाहेर वाळत टाकलेले कपडे दोरीवरून काढून आणायला गेलेली आई तेवढ्या वेळातच ओलीचींब होउन जायची, ईतका पावसाचा जोर असायचा. मग विजाही चमकायच्या आणि वादळही! कितीही खीडक्यांची तावदानं लावा, की दरवाजे बंद करा, पाऊस घरात यायचाच. चारही दिशांनी झोडपून काढायचा.
विजा कडाडत असतांना बाहेर जायला मिळायचं नाही, तेव्हा घरातनंच पाऊस पहायला लागायचा. मग एखाद्यावेळी मोठा प्रकाश बाहेर दिसला, की थोड्यावेळाने मोठी विज कडाडण्याचा आवाज येणार, त्याची वाट पहात बसायचं. प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त आहे, म्हणून विज चमकलेली आधी दिसते. मग तीचा कडकडाट ऐकू येतो. हे खूप नंतर माहिती झालं, पण त्याआधी जास्त चमकणार्र्या विजेवरून येणारा आवाज किती मोठा असेल याची कल्पना करण्यातच मजा यायची.
पाऊस आमच्या पुर्वमुखी घराच्या मोठ्या दरवाज्यातूनच घरात दाखल व्हायचा. बैठकीच्या खोलीतल्या खीडकीमधून आत येऊन तो स्टुलवर ठेवलेला आजचा पेपर ओला करायचा. आजीच्या खोलीच्या मोठ्या खीडकीतून येणारा पाऊस हमखास तीची अवघी खोलीच भिजवून टाकायचा. आजी मात्र ज्या खोलीत गहू आणि तांदळाच्या कोठ्या होत्या, तीकडे जाऊन उभी असलेली असायची. धान्य भिजलं, तर ते खराब होईल, म्हणून खीडकीच्या फुटक्या तावदानाला ती पेपरच्या गट्ठ्याने झाकत असायची.
पण शहर मुळातच ऋतूवेगळं आहे. ईथे पाऊस आला तरी तो ऑफीसमध्ये जायच्या-यायच्या वेळेपर्यंत दहा-पंधरा मिनिटांची सुट देतो. क़ुणालाच तो जबरदस्ती भिजवत नाही. आडोसेही लवकर मिळतात. आणि शिस्तीत पडणारा पाऊस आडोशाला उभ्या असलेल्या एक्झीकेटीव्जना भिजवतही नाही.
पहिला पाऊस अचानक येत नाही. वेल ईन ऍडव्हान्स नोटीस देऊन येतो. दोन तीन वेळा ढग़ दाटून येतात. पाऊस येत नाही. ही नोटीस समजून लोक गाडीच्या डिक्कीत रेनकोट ठेवणं सुरू करतात. पहिल्याच पावसात रेनकोट निघालेले पाहिले, की आश्चर्यही वाटतं, आणि कामाच्या व्यापात निसर्गाचा आनंद गमावलेल्या लोकांची किवही येते. पण मीही आता याच गर्दीचा भाग आहे.
त्या दिवशी असेच ढग दाटून आले. खूप पाऊस येणार असं वाटलं. म्हटलं भिजायचंच! आणि मुद्दाम निघालो. वारा-वावटळ खूप आली. पण पाऊस आलाच नाही. हिल-टॉप, सिव्हील लाईन्स या तूलनेने हिरव्या भागातही गेलो. पाऊस आला नाही. फुटाळा तलावाच्या काठावर जाऊन उभा राहिलो. पाऊस आलाच नाही. निराश झालो. घरी आलो. आणि शिस्तबद्ध पावसाने बरसायला सुरूवात केली. शहरातला पाऊसच भिजवायला तयार नसतो. मग लोक कोरडेच राहीले, त्यात काय नवल?
तू देखील शहरात राहून कोरडीच राहीलेलीस. मी जे बोललो, त्यातला ओलावा तूला कळलाच नाही. नाही तर नाही. यात तूझा दोष नाही. शहराचाही नाही. हल्ली गावामध्ये राहाणार्र्यांच्या मनातही शहरच वसलेलं असतं. तीथे शहरातच राहिलेल्यांची काय कथा? असो. पावसात भिजायची ईच्छाच झाली नाही, तर न भिजल्याचं दुःख होत नाही. पण भिजायचं असूनही रेनकोट चढवणं म्हणजे मन् मारणं नाही का? तू मन मारतेयस्. भिजत नाहीयेस. आडोशालाच उभी आहेस. आता मी शहराचाच भाग झालोय. म्हणून पाऊसही शहरी आहे. तो तूला जबरदस्तीने भिजवणार नाही. कितीही ईच्छा असली, तरीही.