23.2.11

आर्ट ऑफ लिव्हिंग!!

श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हींग तर्फे आयोजीत केलेल्या लयतरंग नावाच्या संगितसंध्येला गेलो होतो. जगात या आधी कधीच झाला नाही असा हा कार्यक्रम होता. तीन हजार कलावंत (२००० गायक, ५०० वादक, आणि ५०० नर्तक) एकाच वेळी, एकाच रंगमंचावर आपल्या कलेचे सादरिकरण करणार होते. बरं यापैकी कोणीच सोमेगोमे लोक नव्हते. सर्व गायक व वादकांना संगित विषारद किंवा संगितामध्ये पदविपर्यंतचे शिक्षण घेतलेले असणे ही कार्यक्रमात भाग घेण्याआधीची महत्त्वाची अट होती. तीन हजार कलावंतांसाठी ४८,००० चौरस फुटाचा महाकाय रंगमंच तयार करण्यात आला होता. नागपूरचे रेशिमबाग मैदान या कार्यक्रमासाठी सज्ज करण्यात आले होते. जवळपास एक लाख लोक या कार्यक्रमाला येतील, अशी आयोजकांची अपेक्षा होती. त्यामुळे त्या प्रमाणात बैठक व्यवस्था, पार्किंगची सोय वगैरे जवळपास करण्यात आली होती. पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर लावण्यात आला होता. ई-एस-एम-एस या खासगी कंपनिचे सेक्युरीटी गार्डसही जागोजागी तैनात करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी व्हिव्हिआयपी, व्ही आयपी, विषेश निमंत्रीत, निमंत्रीत, तसेच तिकिट काढून आलेले लोक आणि फुकट येणारे लोक, या सगळ्यांची योग्य व्यवस्था व्हावी अशी योजना करण्यात आली होती. प्रचंड गर्दी झाली.

सायंकाळी सहाचा कार्यक्रम साडेसात वाजता सुरू झाला, तरीही लोकांचे येणे सुरूच होते. अनेकांना -निमंत्रणपत्राअभावी प्रवेश पासनाकारण्यात आला, तर अनेकांना या ना त्या कारणास्तव दरवाज्यावरच ताटकळत उभे रहावे लागले. हा ऐतिहासिक सोहळा याचि देही याची डोळा पाहण्यासाठी म्हणून अक्षरशः लाखभर लोक रेशिमबागच्या मैदानावर जमले.

श्री श्रींचं रंगमंचावर आगमन झालं, तेच मुळी आनंदाने धावत पळत. त्यांनी येताच सगळ्यांना हात दाखवून अभिवादन केलं, आणि सगळ्या कलावंतांमध्ये उत्साह, जोश संचारला. "आज तो सुरो का तरंग नही, सुरो का तुफान आयेगा! वाह! अच्छा है! शुरू करो!" असे आशिर्वाद देऊन त्यांनी कार्यक्रमाला सुरूवात करायला सांगितली. गणेश वंदना सुरू झाली. दोन हजार गायकांचा एक आवाज, पाचशे वादकांचा एक सुर, आणि पाचशे नर्तकांचा एक ताल हे खरोखरच विलोभनिय दृष्य़ होते. नजरेच्या एका टप्प्यात संपुर्ण रंगमंच येणं अशक्यच होतं. एका कॅमॅर्र्याने हा महा-कार्यक्रम टिपणंही अशक्य होतं. म्हणुनच जवळपास पंचविसेक कॅमेराज हा ऐतिहासिक क्षण चित्रीत करत होते. एकाच वेळी दिडशे देशांमध्ये कार्यक्रमाचं जिवंत प्रक्षेपण सुरू होतं. सगळंकाही एकंदर भव्यदिव्य आणि देदिप्यमान! लाखभर लोक हजर होते. रंगमंचामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये कमीत कमी दोनशे फुटाचं अंतर होतं. त्यातल्या त्यात रंगमंचावर तीन हजार लोक! शिवाय श्री श्री! तरिही लोक तल्लीन होउन कार्यक्रम ऐकत होते. हो. ऐकत होते असंच म्हणावं लागेल्, कारण दिसत तर काहीच नव्हते. एक तर दर्शकदिर्घेच्या ठीक समोर व्हीडिओकॅमेरे आणि माध्यमांच्या प्रतिनिधींची सोय केली होती. शिवाय रंगमंच्यावर रोषणाई करणारे लाईटमॅनही नेमकेच समोर उभे होते. कार्यक्रमाचं भव्यदिव्य स्वरूप पाहू जाता हे सगळं तर होणारच होतं. लोकही हे समजले होते. मिळेल त्या ठीकाणी जागा बनवत लोक बसले होते.

काही लोक आयोजकांवरती तोंडसुख घेत होते -- "पार्कींगची व्यवस्था किती दूर आहे! पाई यावं लागलं!"; "आलो, तर पास दाखवल्याशिवाय प्रवेश नव्हता! आम्हाला ताटकळत उभं रहावं लागलं!"; "प्रवेश मिळाला, तर बसायला जागा नाही! कुठे बसु? खाली? खुर्च्यावर तर पावसाचं पाणी जमा झालंय!"; "जागा मिळाली. पण दिसत नाही ना काहिच्! काय हे? साईडस्क्रीन तर लावायला हव्या होत्यात?"; -- प्रत्येकाची काही ना काही अडचण होती. सहज म्हणुन एका काकांना प्रश्न विचारला, "काय हो? तुम्हाला माहिती होतं ना की ईथे ईतकी गर्दी होणार आहे आणि गर्दिचा तुम्हाला त्रास होतो? मग कश्याला आलात ईथं?" "वा वा! ईतका मोठा कार्यक्रम! आपल्या गावात घडत आहे! मग पहायला नको!?!!" प्रतिप्रश्न फेकुन तावातावात निघून गेले. गर्दिचं, भव्यतेचं, चमकधमकीचं, आणि एकुणच रंगितपणाचं ('भपकेबाजपणाचं' हा शब्द वापरलेला श्री श्रींच्या भक्तांना कदाचित आवडणार नाही) आपल्या लोकांना कित्ती म्हणुन आकर्षण आहे!

कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हींगचा होता. जीवन जगण्याची कला शिकवणारी ही एक संस्था आहे. आध्यात्म आणि संगित यांचा संबंध जवळचा आहे, त्यामुळे हा संगितमय कार्यक्रम आयोजित केला होता. मुळात आर्ट ऑफ लिव्हींगचा मंत्र देणारे एक गुरूदेव आहेत. त्यांचे कोट्यावधी भक्त आहेत. त्यातील काही लाख नागपूरात राहतात. त्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घडला होता. या वर्षी नागपूरात अनेक गुरूदेव आले. मग आपलेही गुरूदेव यायला हवेत, अशी त्यांना ईच्छा होती. म्हणुन भक्तांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

गुरुभेटीची आस प्रत्येकच शिष्याला असते, यात शंकाच नाही. असाविही. मात्र श्री श्री सारखे गुरूदेव साध्या व्हिजिटवर येत नाहीत. असा काहितरी भव्यदिव्य कार्यक्रम हवा असतो. आसारामजीबापू येतात, पण ते याच रेशिमबाग मैदानावर 'भक्त संग गुरू की होली' खेळण्यासाठी! सुधांशु महाराज येतात, ते साठ एकराच्या परिसरात उभ्या केलेल्या नारायणधाम मध्ये कथा करण्यासाठी, अगदी मुनिश्री तरूणसागरमहाराज येतात, ते देखील चातुर्मास करून भव्य सत्संग करण्यासाठी. गुरूदेव नारायणदत्त श्रीमालींची मुलेही आता गुरूदेव झाली आहेत, आणि ती देखील आपल्या गावात आणायची असतील तर भक्तगणांना मोठा समारंभ आयोजीत करावा लागतो. भव्यदिव्य काही अलौकीक असेल, तरच गुरूदेव येतात. ही खरी गुरूशिष्यांची परंपरा आहे का? की निव्वळ देखावा! "तुमचे गुरूदेव साठ हजार लोकांवर मशिनच्या पीचकारीने रंग उडवून 'होली' खेळतात का? मग आमचे गुरूदेव बघा, एक लाख लोकांशी एकत्र संवाद साधतात - संपुर्ण स्टेडिअमवर!" अशी ही अघोषित स्पर्धा तर नव्हे? साठ हजारांशी होळी खेळणारे आसारामबापू असोत, किंवा एक लाख लोकांशी एकत्र संवाद साधणारे श्री श्री रविशंकर असोत, या एक लाखांपैकी, किंवा या साठ हजारांपैकी कितींचा प्रत्यक्ष उद्धार त्यांनी केला असेल? काही मोजक्या धनदांडग्यांचा अपवाद वगळता किती लोकांशी त्यांनी वैयक्तीक संवाद साधला असेल?

छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते जागोजागी स्थापलेल्या मारूतीच्या मंदिरात येणार्र्या प्रत्येक सामान्य माणसापर्यंत सगळ्यांनी रामदासस्वामींना गुरू मानलेलं होतं. मात्र म्हणून काही त्यांनी एकत्रपणे सर्व भक्तांशी संवाद साधलेला आठवत नाही. वारकरी संप्रदाय गेल्या साडेसातशे वर्षांपासून केवळ विठुनामाच्या एका गजराच्या भरवश्यावर आणि वारकरी ध्वजाच्या खाली एकत्र येतो आहे, मात्र चंद्रभागेच्या तीरावर कुण्यातरी एका संतानेच तत्संग घेतल्याचं ऐकिवात नाही. नाथांचं किर्तन झालं की चोखोबा भजन म्हणत असंच काहीसं ऐकलेलं आहे! आणखी भुतकाळात गेलो, तर तथागत भगवान गौतमबुद्धांचा शिष्यसमुदाय खुप मोठा होता असं म्हणतात. आश्रमाची शिस्त त्यांच्यात होती. मात्र भगवान बुद्धांचे उपदेश करतांनाचे कुठलेही चित्र, अथवा लेणी पहा, त्यात ते भक्तांच्या अगदी मधोमध बसलेले आपल्याला दिसतील. दोनशे फुट दूरच्या उच्चासनावरून बोधिसत्त्वाने कधी उपदेश केला नसावा. याहिपेक्षा मागे जाऊ. वैदिक काळात गुरुगृहं म्हणजे विद्यापिठं होती. भर अरण्यात वसलेले ऋषिमुनिंचे आश्रम हे अडल्यानडलेल्यांचे आधार होते. आज या हाय प्रोफाईल गुरूदेवांपैकी कुणाच्या आश्रमात तुम्हाला सहज प्रवेश आहे? पुर्विच्या साधुसंतांचं जिवन केवळ अध्यात्मीक उपदेशच नव्हे, तर त्याहूनही अधिक बरंच काही होतं. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांपासुन ते गाडगेबाबांपर्यंत सगळ्यांनी अन्नदानाचा संकल्प मांडला, तो आजतागायत सुरू आहे. 'गुरूदेव' स्टाईलचे संत तीन तीन हजार रूपये शुल्क आकारून कोर्सस कंडक्ट करतात, किंवा आयुर्वेदिक औषधी कमी दरात, शालेय साहित्य कमी दरात देऊन समाजाचं शतकोट्यावधींचं देणं लक्षावधींमध्ये फेडू पाहतात. यातून सत्संगात नाचणारे मल्टीमिलॅनिअर जमा होत आहेत, पण त्याच रेशिमबाग मैदानावर रात्री झोपणारा भिकारी मात्र या कार्यक्रमाच्य आयोजनापूरता तीथून हाकलून देण्यात आला आहे. तो परत येइल, तेव्हा तीथेच झोपेल. त्याचं आयुष्य बदलणार नाही. अनेक गुरुदेवांच्या आश्रमांनी गावे दत्तक घेतली. त्या गावात सुविधा पुरवल्या. अनेक ट्र्स्ट दवाखाने चालवतात. फुकट शस्त्रक्रीया करतात. पण या विधायक कार्यांवर कमी आणि गर्दी जमवणार्र्या कार्यांवर या संस्थांचा जास्त भर का म्हणुन असावा ते कळत नाही.

उपदेश त्यांनीही केला. उपदेश दे देखील करत आहेत. त्यांनी देखील चार चांगल्याच गोष्टी सांगितल्या, हे देखील चार चांगल्याच गोष्टी सांगत आहेत. गर्दि खेचून आणल्यावर त्या गर्दिच्या कानावर चार चांगलेच शब्द पडत आहेत, हे शंभर टक्के सत्य आहे. पण मुळ आत्मोन्नतीच्या उद्देशाला शेकडो योजने मागे सोडून केवळ गर्दी जमा करून भव्यदिव्यतेचा आविष्कार घडवून आणण्यात कुठले शौर्य आहे हे कळायला मार्ग नाही!

शेवटी मार्ग दाखवणारे हजार. आपला मार्ग आपल्यालाच शोधायचा आहे, हेच उमगलं.