12.7.14

गुरुज्ञान आणि गुरुकृपा


लेखनप्रपंचाचा पुनश्च हरीओंम करण्यासाठी आजच्या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्ताहून चांगला मुहूर्त तो कोणता? खरं पाहिलं तर ‘अवघा तो शकून, हृदयी देवाचे चिंतन’ असे जगदगुरू तुकोबाराय सांगून गेलेत. त्यामुळे मुहूर्त वगैरे पाहण्याची गरजही नाही.  पण नव्याने सुरुवात करण्यासाठी एखादा लक्षात राहण्यासारखा दिवस असणेही जरुरीचे. कदाचित या दिवसाच्या प्रेरणेने सुरु झालेले हे लेखन परत थांबणार नाही याची काळजी सद्गगुरूंनाच असावी म्हणून त्यांनी आजचा दिवस निवडला.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घडवण्या-या प्रत्येकाचे स्मरण होणे सहाजिक आहे. आई-वडील, आजी-आजोबा, पहिले शिक्षक, आणि नंतर ओघा ओघाने येणारे अनेक मार्गदर्शक, विविध क्षेत्रातले आपले आदर्श, आणि शेवटी समर्थ सदगुरू. वास्तविक पाहता माणूस आयुष्यभर प्रत्येक क्षणी काही ना काही शिकतच असतो. म्हणजे तो असतो विद्यार्थीच. या जीवनाच्या शाळेचा प्रत्येकजण विद्यार्थीच आहे, तर मग कुणी एक गुरु कसा काय होतो? केवळ आपल्या पेक्षा वय, अनुभव आणि माहिती जास्त असणारी व्यक्ती आपला गुरु होवू शकते का? की गुरु म्हणजे कुणीतरी चमत्कारी व्यक्ती, अलौकिक पुरुष, की प्रत्यक्ष देव? गुरु ही एक व्यक्ती नाही. ते तत्त्व आहे. कुणाला आपल्या गुरुपदी बसवण्यासाठी त्याचे वय, वर्तमान, शिक्षण, अनुभव या कसोट्या लावून चालत नाही. चमत्कार करण्याची क्षमता, मनातलं ओळखण्याची कला, बोलण्याची चलाखी ह्या गोष्टींचाही तिथे काहीच उपयोग नसतो. आपल्या मनाचे आणि समोरच्या व्यक्तीचे तार जुळायला हवेत. तरच ते साध्य होतं. मग केवळ ‘गण गण गणात बोते’ म्हणणारे गजानन महाराज मोठमोठ्या साहित्य आणि भाषा-प्रभूंचे गुरु होतात.

गुरु म्हणजे ज्ञान देणारा, की ज्ञान मिळवण्याचा मार्ग दाखवणारा? गुरु म्हणजे संकटातून वाचवणारा की त्यांचा सामना करण्याची शक्ती देणारा? केवळ आपल्याला येणा-या अडचणी दुर करणारा ट्रबल शुटर म्हणजे गुरु का? गुरु म्हणजे आपल्या मधील असलेल्या शक्तीचा आपल्याला परिचय करून देणारे तत्त्व आहे. गुरु पदावर बसणारी व्यक्ती गौण आहे. गुरु तत्त्वाशी आपली मानसिक जोडणी किती बळकट आहे, त्यावर सगळकाही अवलंबून आहे.

जर ज्ञान देणाराच गुरु असं मानलं, तर पितामह भीष्म, द्रोणाचार्य, आणि कर्ण या तिघांनाही भगवान परशुरामांनीच ज्ञान दिलं. या तिघांचीही पात्रता होती म्हणूनच परशुरामांनी त्यांना शिष्य म्हणून निवडलं. मात्र तिघांचीही नियती अगदी वेगळी होती. कर्णाने धनुर्विद्येचं ज्ञान प्राप्त केलं, हे नक्की, पण त्याला गुरुकृपा प्राप्त झाली नाही. म्हणजेच गुरुकडून ज्ञान प्राप्त करून घेण एकदा सहज होईल, पण त्यांच्या कृपेसह हे ज्ञान प्राप्त करण हे अवघड आहे.

बलरामांना गुरु मानून गदायुद्ध शिकणारे त्यांचे दोन शिष्य एकाच तोडीचे आणि क्षमतेचे होते. मात्र विजय भीमाचा झाला. अगदी प्रत्यक्ष बलरामांचा पाठिंबा दुर्योधनाला असुन देखील! म्हणजेच ही गुरुकृपा मिळवून देणे हे केवळ गुरुच्या हाती देखील नाही. त्यासाठी शिष्याची पात्रता, सहजभाव, त्याचे धर्मसंगत, न्यायसंगत असणे, आणि योग्य मार्गावर चालणे हे महत्त्वाचे आहे.
म्हणूनच मग केवळ दगडा मातीच्या मूर्तीला गुरु मानून साधना करणारा एकलव्यदेखील गुरुकृपेचा धनी होतो. द्रोणाचार्य नावाच्या शिक्षकाने त्याच्याशी केलेल्या धोक्यानंतर सुद्धा तो श्रेष्ठ धनुर्धारी म्हणूनच गणला जातो, याचं कारण त्याच्यावर झालेली कृपा. ही कृपा द्रोण नावाचा व्यक्ती  खचितच करत नाही. ती एकलव्याच्या समर्पणातून त्याच्यावर होते. ती थेट गुरु तत्त्वाकडून.

आज आध्यात्मिक गुरु म्हणून प्रत्येकाने कुणाला न कुणाला मानण्याचा प्रघात आला आहे. कुणाला तरी गुरु मानून, त्याचे पाय धरून, त्याचे भजन पूजन आणि जप करून कदाचित त्या व्यक्तीकडून सहयोग, मार्गदर्शन आणि वेळ पडल्यास पाठिंबा प्राप्त होईल. आपली पात्रता मोठी असेल तर ज्ञान आणि सामर्थ्यदेखील मिळेल. मात्र गुरुकृपा मिळवण्यासाठी वेगळ्याच समर्पणाची, आचरणाची, आणि योग्य मार्गावर चालण्याची गरज जास्त आहे. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुज्ञानाबरोबरच  गुरुकृपेसाठीदेखील पात्र ठरावे हीच सद्गुरुंना प्रार्थना.
ग्यान प्रकासा गुरु मिला, सों जिनि बीसरिं जाइ। 
जब गोविंद कृपा करी, तब गुर मिलिया आई॥

No comments:

Post a Comment