12.6.12

माणसांचं गाव. गावचं माणूस.

रात्रीच्या बसनेच घरून निघायचं ठरवलं. म्हणजे सकाळपासुन दिवस मोकळा मिळतो. नाहितरी रात्रभर घरी थांबुन करणार काय? झोपायचंच आहे! त्यापेक्षा तेवढ्या वेळात नागपूरला पोचता येणार होतं. त्यातला त्यात पहिला पाऊस आलेला. गावातल्या हवेतला ओलावा काही सहजासहजी पाय निघू देत नाही. नेमकं जायच्या वेळलाच सगळंकाही एकत्रपणे होतं -- पाऊस, मित्रांचं येणं, जेवायला उशीर, आणि लाईन जाणं, अंधार! पण तरीही तयारी केलीच.

पावणेदहा वाजता बसस्टॅंडवर पोचलो. नांदेड-नागपूर लांब पल्ल्याची गाडी. खिडकीजवळची जागाही मिळाली आणि मस्त थंड हवाही. पंधरा मिनिटात झोप येणार ह्याची खात्री झाली. पण कमीतकमी तिकिट घेइपर्यंत तरी जागं राहणं आवश्यक होतं.

"नागपूरला कधी पोचायची गाडी?" खच्चुन भरलेल्या बसमध्ये तिकिटं देण्यात गुंतलेल्या कंडक्टरला एका प्रवाशानं विचारलं. "साडेतीन तास लागते," कंडक्टरने तडक आणि कडक उत्तर दिलं. "अर्ये बापरे! बरंच दूर आहे म्हणायचं," खिडकीच्या बाहेर बघत प्रवासी स्वतःशीच बोलला. "दिडशे किलोमिटर आहे. दिडशे!" त्याच्या बाजुला बसलेल्या दूस-या प्रवाशाने त्याच्या ज्ञानात भर पाडली. त्यानंतर यवतमाळ-नागपूर प्रवासादरम्यान लागणारी गावं, नागपूरला नेमकं कुठे उतरल्यावर सोयिचं होईल, नागपूरवरून पुढे जाण्यासाठी कोणती गाडी किती वाजता मिळेल, ईत्यादी विषयांवर त्यांची चर्चा रंगली.
यवतमाळ-नागपूर मार्गाबद्दल अगदीच अनभिज्ञ असलेला माणुस मी बरेच दिवसांनी पाहिला. या माणसाला कळंब, देवळी, बुटिबोरी वगैरे गावांची नावंही माहिती नव्हती. वर्धा जिल्हा आहे. शिवाय रेल्वेस्टेशन. त्यामुळे ऐकुन थोडीफार माहिती होती. बोलण्याच्या पद्धतीवरून तो लातुर उस्मानाबादकडचा वाटत होता. "महाराष्ट्रात राहणा-या माणसांना महाराष्ट्राबद्दलच पुरती माहिती नाही! काय विचित्र परिस्थीती आहे!" असा विचार मनात आला. मग आपल्याला तरी किती माहिती आहे? असा प्रश्नही आला. आणि मग लक्षात आलं की मागच्या महिन्यात कोल्हापुरला गेलो होतो तेव्हा आपलीही अवस्था अशीच झाली होती.

पंढरपूरवरून कोल्हापूरला जायला किती वेळ लागतो? कोल्हापूरवरून गोंदवल्याला सातारा की क-हाड -- नेमकं कुठून जावं लागतं? कोल्हापूरवरून मुंबई आणि उपनगरांकडे जाणा-या बसेस नक्की साता-याला जातात ना? सगळी माहिती इतरांना विचारूनच काढली होती. दहिवडी, म्हसवड ही गावांची नावं अगदीच नवी होती. नेमकं कुठलं गाव आलंय? आणि ईथे गाडी किती वेळ थांबणार! याचा पत्ताच नसायचा. लातुर, उस्मानाबाद, तुळजापूर, सातारा, क-हाड, या शहरांबद्दल ऐकुनच सगळं माहिती होतं. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, मराठी म्हणवतो, त्या आपल्या राज्याबद्दल आपल्याला किती कमी माहिती आहे? आपण खुपच मोठे मुर्ख आहोत. असा विचार मनात आला.

असो. फार माहिती नसली, तरी आपल्याला बरिच माहिती आहे देखील्! निदान विदर्भाबद्दल तर आहेच. यवतमाळ-अमरावती-अकोला-नागपूर-चंद्रपूर- बस! विदर्भात अकरा जिल्हे. त्यापैकी एवढेच आपण पाहिले. त्यातल्या त्यात यवतमाळ-अमरावती आणि नागपूरच ब-यापैकी माहिती आहे. बाकी ठीकाणी काय - एक दोन धावत्या भेटी! म्हणजे एवढीही माहिती नाही?!

असो. निदान आपल्या यवतमाळ जिल्ह्याबद्दल तर आपण खुपकाही जाणतो. दारव्हा, पुसद, उमरखेड, याव्यतिरिक्त चौथ्या कुठल्याच गावात रहायला गेलेलो नाही. नेर, दिग्रस, मारेगाव, राळेगाव, महागाव, घाटंजी, बाभुळगाव, पांढरकवडयाला अध्येमध्ये कधीतरी एक-दोन दिवसाची भेट. कसल्याश्या वादविवाद-वक्तृत्त्व स्पर्धेच्या निमित्ताने किंवा एखाद्या छोट्याश्या कामाच्या निमित्ताने. याशिवाय झरी-जामणी वगैरे तालुका नक्षलग्रस्त आहे एवढंच माहिती आहे. म्हणजे यवतमाळ आपला जिल्हा असुनही प्रत्यक्ष अनुभव फारच थोडा. अधीकच शरम वाटली.

पण म्हणुन काय झालं? यवतमाळ शहर,  आपलं जन्मगाव! निदान या शहराची तर गल्ली-न-गल्ली आपण ओळखतो. ईतपत विचार सुरू असतांना बस शहराच्या बाहेर आली होती. नवीन बायपास रोडच्या आजुबाजुला आता फ्लॅटस तयार होत आहेत. छोट्या टाऊनशिप्स. अरेच्या! हे तर माहितीच नव्हतं. गाव सोडून पाच वर्ष झालीत. किती बदललं असणार सगळं. पुढेही बदलत राहिल. म्हणजे आपल्याला आपलं गावही पुरतं माहिती नाही. अरेरे!

मग मोजणीचं एकक आणखी एक घर खाली आणलं. आपल्याला आपलं घर पुर्णतः माहिती आहे. अगदी प्रत्येक कोपरा-न-कोपरा! पण यात काय मोठी गोष्ट आहे? घर आहेच असं केवढं? पण काहीही असो. घर आपल्याला आपलं वाटतं. पुर्ण माहिती आहे म्हणुन नाही, पण त्यातली माणसं आपली आहेत म्हणुन. माणसंच कश्याला? त्यातले कोपरे, त्यातली झाडं, झाडावरची घरटी, त्यातले पक्षी सगळे आपल्याला आपले वाटतात. आपण घराला, घरातल्या सजीवनिर्जीवाला आपलं मानतो म्हणुन घर आपल्याला माहिती होतं.

थोड्याफार फरकाने तसंच काहीसं मुळगावाचंही. यवतमाळ आपलं वाटतं कारण या गावातले लोक, शाळा, कॉलेज, रस्ते, मैदानं, दूकानं, सगळं आपलं वाटतं. फिरायला निघालो तर चार जण ओळखीचे भेटतात म्हणुन गाव आपलं. म्हणजे शेवटी माणसांमुळेच आपलेपण येतं. अनोळखी प्रदेशाचा अवघा नकाशा आणि गल्ली-न-गल्लीची खडा-न-खडा माहिती असणारं पुस्तक, किंवा तसा एखादा रोबोट जरी बरोबर घेऊन फिरलं, तरीही तो प्रदेश आपला वाटत नाही. कारण? सरळ आहे. माहिती कितीही असली, तरी माणसं आपलीशी झाल्याशिवाय प्रदेश आपला होत नाही.

आणि माणसं आपलीशी केली की मग सगळंच आपलं होतं. कोल्हापूरहून गोंदवल्याला जायचं असेल तर साता-यापेक्षा क-हाड मार्गाने जा, असा मोलाचा सल्ला देणारा तो कंडक्टर; क-हाडवरून सरळ दहिवडीची गाडी पकडा आणि त्या मार्गाने गोंदवल्यासाठी निघा असं सांगणारे ते गृहस्थ; दहिवडीवरून म्हसवडला जाणा-या बसमध्ये बसा, म्हणजे गोंदवल्याला सरळ जाता येइल, असा सल्ला देणारा तो शाळकरी मुलगा; आणि माझ्या बसमधल्या माणसाला यवतमाळवरून नागपूर दिडशे किलोमिटर आहे असं सांगणारा तो बाजुचा माणूस; ही सगळीच माणसं अनोळखी गावाला आपलंसं करण्याचे सोबती ठरतात.

गाव, त्यातलं अंतर, त्याचं वैषिष्ट्य, त्याचं वैगुण्य, सगळं काही माहिती होतंच. बस, माणसांना बोलतं करण्याचं, माणसांना माहिती करून घेण्याचं कसब जवळ असलं पाहिजे.

No comments:

Post a Comment