21.8.12

जीव जडल्यावर मन मोडतांना


जीव जडल्यावर मन मोडतांना होणा-या वेदना कश्या असतात याचा अनुभव घेत नागपूर सोडलं तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. केरला एक्सप्रेसच्या खिडकीच्या बाहेरून हात हलवणारे बाबा त्यांच्या चेह-यावरची काळजी आणि लेकरू दूर जाण्याचं दुःख लपवू शकत नव्हते. पत्रकारांसाठी खुप महत्त्वाच्या आणि मानाच्या असलेल्या या शिबिरासाठी जाणा-या मला हात हलवून शुभेच्छा देणा-या मित्राच्या मनात अभिमान, आनंद आणि हूरहूर सगळं एकत्र दाटून आलेलं. वर्षभर ज्या क्षणासाठी अनेक प्रयत्न केले  तो क्षण प्रत्यक्षात येत असल्याचा आनंद आणि येत्या महिन्याभरात अनुभवांच्या खजीन्यात होणार असलेल्या दशलक्षावधी टनांच्या वृद्धीबद्दल वाटणारं सुख या सर्वांनी मी तर हूरळून जायला हवं  होतं. पण माझी अवस्था पुर्णतः वेगळीच झाली. प्रत्यक्ष रडायला येत नव्हतं, पण आसु थांबत नाहीयेत असं वाटत होतं. तयारी निट सुरू होती. सामान निट पॅक करणे, सुटकेससाठी कुलुप  घेणे, ट्रेनमध्येही सग़ळं सामान निट ठेवणे, सगळं काही यंत्रवत सुरू होतं. शरीर काम करतंय आणि मन कुठेतरी कोप-यात बसुन रडतंय अशी अवस्था झालेली. पुन्हापुन्हा तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता.

"मी रडणार नाही. नाहीतर माझा रडका चेहराच तुझ्या लक्षात राहिल. एक महिन्यापेक्षा जास्त दिवस काढायचे आहेत ना आपल्याला!," तीचं स्वतःला समजावणं आणि मला धिर देणं सुरू होतं.
दोघांनाही वाटत होतं की एकमेकांपुढे रडायचं नाही आणि दोघांनाही माहिती होतं की एकट्यात दोघेही खुप रडणार आहोत. आणि का नाही येणार रडू? आता काल-परवा तर सगळं सुरळीत होउ लागलेलं होतं. ईथे काल-परवा म्हणजे अगदी शब्दशः काल परवा!

सोळा तारखेला लग्न ठरलं आणि अठरा तारखेपासुन महिन्याभराचा विरह. या आधी आलेले चढ उतार, रागलोभ, रुसवे फुगवे दोघांनी मिळून एकमेकांना धिर देत निभावून नेलेले. कुठल्याही परिस्थीतीत एकमेकांना साथ द्यायची हे ठरवून अगदी तसंच वागलेलो. आताशा कुठे सगळं निट झालं. सेलिब्रेट करायला हवा होता हा आनंद पण तसा वेळच झाला नाही. सगळं सेलिब्रेशन गेलं एक महिन्यावर! मग एका स्वप्नासाठी दुस-या स्वप्नाला लांबणीवर टाकत निघालो, गाडीने नागपूर स्टेशन अलगद मागे टाकलं, तसं.

पहाटे पाच नंतर झोप लागली आणि सकाळी आठ वाजता जाग. एव्हाना आंध्रप्रदेशात आलो होतो. म्हणजे तेलंगणात. खुपसा विदर्भासारखाच आहे हा भाग  असं विक्रम रेड्डीने सांगीतल्याचं स्मरणात होतं. ते खरं आहे. झाडाच्या, मातिच्या रंगापासुन ते अंगाला लागणा-या वा-यापर्यंत सगळं आपलंसं वाटावं असं आहे ईथे. धानाची शेती, हिरवळ आणि शेततळी. डोळ्यात भरावं ईतकं वैभव आंध्राच्या शेतीमध्ये आहे. तरीही ईथला शेतकरी विदर्भाच्याच शेतक-यासारखा दुःखी आहे. ईथेही वेगळ्या राज्यासाठी कित्येक वर्षापासुन आंदोलनं सुरू आहेत. ईथेही एका भागाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्या भागावर अन्याय केला आहे. आपल्याकडे नाईक, पाटिल आहेत, आणि ईकडे रेड्डी! आपल्याकडेही सामान्यांना चेहरा नाही, आणि ईकडेही. शेवटी भारतातच आहोत आपण, दुस-या देशात नाही ही खात्री ईथे येउन पटली.

तिरूपतीला गाडी थांबली तेव्हा खाली उतरून या पावन नगरालाच वंदन करून आलो. बालाजीचा डोंगर दुरून दिसतो. व्यंक़टेश्वराचे तेवढेही दर्शन पुरेसे. लहान असतांना रांगेत उभे राहून दिवसभराच्या प्रतिक्षेनंतर व्यंकटेशाचे सोन्याने मढलेले रूप चारेक सेकंदांपर्यंत पाहिल्याच आठवते. तिरूपती म्हटलं की सामान्यांच्या दृष्टीने जवळचा असा श्रीमंतीचा विषय तर निघालाच पाहिजे. तसा तो गाडीत बसल्यावर चर्चेला आला. हल्ली लोकांकडे काळा पैसा खुप झालेला आहे, म्हणुन आपले पाप देवाने पचवावे या उद्देशाने लोक पैसा दान करतात. भ्रष्ट मार्गाने पैसे मिळवणा-यांना येणारा गिल्टी फिल, किंवा असुरक्षिततेची भावना कोट्यावधीचं दान करायला भाग पडते वगैरे चर्चा रंगल्या.

रात्री कधीतरी आयडिया मोबाईल्सचा एक मॅसॅज आला. कि वेलकम टू तामिल नाडू! झोपेतच तो मॅसॅज पाहिला आणि दुर्लक्ष केलं. पहाटेच्या सुमारास पुन्हा मोबाईल वाजला. मॅसॅज असणार. आणि तो ही कंपनीचाच. कारण सरकारने आता मॅसॅजॅस वर बंदी आणलेली आहे. त्यामुळे मित्रांचे, ऑफीसमधल्या कलिग्सचे, किंवा 'तीचे' मॅसॅजेस येणं दुरापास्तच. तरीही ती पाच मॅसॅजेस पाठवते. अगदी पूरवून पुरवून! कसली विचित्र परिक्षा आहे ना ही? एकाच गावात असतांनादेखील दिवसभरात शे-दिडशे मॅसॅजेस पाठवणारे आम्ही, आणि आता ईतके दूर असुन साधे पाच मॅसॅजही पाठवू शकत नाही!

अंदाजाप्रमाणे मॅसॅज कंपनीचाच होता. केरळ आल्याचं सांगणारा संदेश. पण मॅसॅज वाचण्याच्या आधीच बाहेर दिसणारी नारळाची झाडं आणि अगदी नव्याको-या छायाचित्रात चमकून दिसेल अशी हिरवळ पाहूनच आपण केरळमध्ये आल्याचं कळलं. सोनेरी ऊन म्हणजे काय ह्याचा सगळ्यात सोनेरी प्रत्यय यावा असं ठीक़ाण म्हणजे केरळ! गॉडस ओन कंट्री -- म्हणजे प्रत्यक्ष देवाचंच स्वामित्त्व असणारा प्रदेश असं त्याला म्हट्लंय ते उगाच नाही. अगदी निसर्गचित्रांमध्ये लहान मुलांनी काढावे तसे रस्ते, वनराई, नदी, नाले, आणि शेती प्रत्यक्षात पहायला मिळते ती या प्रदेशात. घराचा मागचा दरवाजा अगदी तलावातच उघडतो, हे बघतांना आश्चर्यही वाटतं आणि थोडं विचित्रही. केरळमधल्या शेतातही मोठमोठी शेततळी आहेत. ईथल्या शेतातल्या झोपड्या, किंवा कौलारू घरं खुप नवीकोरी वाटतात. कदाचित नुकत्याच आलेल्या पावसात धुवून निघाली असतील म्हणुन असेल. सगळंकाही नवं दिसतं, चकाकणारं. ट्रेनच्या अगदी समांतर जाणारा रस्ता, कौलारू घरांच्या अगदीच जवळून जाणारी रेल्वेगाडी, आणि फाटक नसतांनाही रेल्वेगाडीसाठी शिस्तीत थांबलेले लोक; अशी  अनेक दृष्य़ं या प्रवासात डोळ्याने हेरली.

दहाच्या सुमारास एर्नाकुलम स्टेशनवर गाडी थांबली आणि रेल्वे स्टेशन सगळीकडचे सारखेच, असा अनुभव घेत पुढं निघालो.  स्टेशनच्या मुख्य़ द्वारावरच स्वागतासाठी उभे होते भारतीय जलसेनेचे जवान. पांढ-याशुभ्र पोषाखात पांढ-याच गाड्या घेऊन उभे असलेले नेव्हीचे जवान आम्हाला घेऊन आमच्या मुक्कामी  म्हणजे हॉटेल ट्रीडेन्ट् येथे आम्हाला घेऊन आले. सगळ्यांशी अनौपचारिक  ओळख झाली. ज्या खोलीत येता आठवडाभर रहायचे आहे ती खोली, ते हॉटेल पाहून झाले. केरळचे निसर्गसौंदर्य भरभरून दिसावे याची पुर्ण काळजी येथे हॉटेलच्या ईंटेरिअर डेकोरेटर आणि आर्कीटेक्टने घेतलेली आहे. आज संध्याकाळी हॉटेलच्या कॉन्फरन्स रूममध्येच सर्व सहका-यांची आणि कोर्सच्या मुख्य कार्यवाहांची औपचारिक ओळख होइल. त्यानंतर उद्यापासुन ख-या अर्थाने कोर्सची सुरूवात.

No comments:

Post a Comment